सामान्य माणसाला विभक्त ठेवून कोणत्याही विकासाची परिभाषा होऊ शकत नाही. विकासासोबतच सृष्टीचे संवर्धन आणि प्राणीमात्रावरील सहिष्णुता त्यात अंतर्भूत असली पाहिजे, असा विश्वकल्याणाचा मौलिक विचार जगाला देणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'एकात्म मानवदर्शन' तत्वाचा अनुयायी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. 'एकात्म मानवदर्शन' हा जीवनाकडे, जीवनशैलीकडे पाहण्याचा समग्र दृष्टिकोन आहे. मानवी जीवनाचे ध्येय केवळ भौतिक सुख मिळवणे नसून शरीर, मन, बुध्दी आणि आत्म्याचा संतुलित विकास. या मानव दर्शनात पंडितजींनी 'अंत्योदय' ही संकल्पना मांडली असून शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहचली पाहिजे. पंडितजींची ही संकल्पना केवळ तत्कालीन घोषणा नसून एक व्यापक मुल्याधरित तत्वज्ञान आहे. याच तत्त्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विविध कल्याणकारी योजना राबवत असून खऱ्या अर्थाने अंत्योदय साधत आहेत.
प्रधानमंत्री जनधन योजना, आवास योजना, मुद्रा योजना, श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत यासारख्या असंख्य योजना ह्या अंत्योदयच्या द्योतक आहेत.
पंडितजींनी मांडलेला पर्यावरणीय दृष्टीकोनही महत्त्वाचा आहे. “प्रकृतीशी” सुसंवाद ठेवणाऱ्या जीवनशैली, “वसुधैव कुटुंबकम्”, “सर्वे भवंतु सुखिनः” यांसारख्या मूल्यांवर आधारित आहे. भारताने या मूल्यांना आंतरराष्ट्रीय मंचावर प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली असून भारत पर्यावरण संतुलनातही अग्रणी भूमिका घेत आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वातंत्र्योत्तर काळात कम्यूनिझम, साम्यवाद, समाजवाद या विचारांच्या संभ्रमात, भारत दिशाहीन होत असताना मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात १९६५ मध्ये 'एकात्म मानवदर्शन' या तत्वज्ञानावर त्यांनी आपले विचार प्रकट केले होते. त्या तारखा होत्या २२ ते २५ एप्रिल आणि साठ वर्षानंतर याच तारखांना त्याच ऐतिहासिक वास्तूत पंडितजींच्या विचारांना युवा पिढी सोबत मांडताना मला अत्याधिक आनंद अनुभवता आला. पंडितजीच्या विचारांचे सध्या जगभरात संशोधन होत आहे. भारताला अध्यातमिक्तेसोबत शक्तिशाली राष्ट्र म्हणून जगात नवी ओळख मिळत आहे. या पार्श्वभुमीवरच नव्या पिढीत 'एकात्म मानवदर्शन' हे विचार रुजवण्यासाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव समितीची स्थापना केली. या समितीचे अध्यक्षपद भूषवताना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार याची पूर्ण जाणीव आहे.
विशेष म्हणजे पंडितजींनी महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत विश्वकल्याणाचा मार्ग जगाला सांगितला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारात राष्ट्रप्रेमासह , संपूर्ण विश्वातील मानवाच्या सर्वागीण विकासाचे मर्म जपले गेले आहे. त्यांच्या विचारांचा खजिना व्याख्यानमालेच्या माध्यमाने जनतेसमोर उघडता आला, याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. हा विचारांचा ठेवा श्रोते नक्कीच आयुष्भर जपून ठेवून ते विचार अंगिकारतील असा आम्हाला विश्वास आहे.
रुईया महाविद्यालयात २२ एप्रिल रोजी तामिळनाडूचे महामहीम राज्यपाल आर. एन. रवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. तर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत व्याख्यानमालेच्या समारोप झाला. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी विशेष उपस्थिती लाभली.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'एकात्म मानवदर्शन' या तत्वाला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील आंबेकर, रा. स्व. संघाचे सह सर कार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल, संघाचे सह सर कार्यवाह डॉ. मोहन वैद्य, भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री व्ही. सुरेश तसेच सह संघटन मंत्री शिवकुमार यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांना उजाळा दिला.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार हे भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेवर आधारित असून, जागतिक समस्यांवर प्रभावी उपाय दर्शवितात. समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, शाश्वत विकास यांच्याशी संबंधित त्यांच्या मानवनिष्ठ दृष्टिकोनाचे आजच्या काळातही महत्त्व अधोरेखित होते.
व्याख्यानमालेचा समारोप नाही तर हा तर आरंभ आहे. यापुढे वर्षभर पंडित दीनदयाळ 'एकात्म मानवदर्शन ' महोत्सव समिती राज्यभर विविध उपक्रम हाती घेऊन पंडितजींचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचणार आहे. पंडितजींच्या 'एकात्म मानवदर्शन ' तत्वावर आधारित पुस्तिका प्रत्येक जिल्ह्यात वितरीत करण्यात येणार आहे. साठ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे असून ते साठ लाख लोक पुढे राज्यातील सहा कोटी जनतेपर्यंत विचार पोहचवतील असा आमचा ठाम विश्वास आहे. विकसित राष्ट्र होण्याच्या भारताच्या प्रक्रियेला 'एकात्म मानवदर्शन' चा आधार असून चला एकात्म मानवदर्शन तत्वाला अंगिकारून या प्रक्रियेत आपले योगदान देऊया.
मंगलप्रभात लोढा
- कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री
- पंडित दीनदयाळ 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव समिती, अध्यक्ष
No comments:
Post a Comment