मुंबई - भारताला हजारो वर्षांचा अध्यात्मिक आणि संस्कृतीक वारसा असून ऋग्वेद आणि अथर्व वेदांच्या अध्यायात विश्वकल्याणाचे बीज आढळते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतील रुईया महाविद्यालयात सुरू असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन कार्यक्रमात त्यांनी भू सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयावर आपले विचार मांडले. त्याचबरोबर भारताचे स्व:त्व या विषयावर बोलताना डॉ. मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले की, पंडितजींचे एकात्म मानवदर्शन हे तत्वज्ञान जगाला दिशा देणारे आहे. भौतिक प्रगती साधली तरी जगात राष्ट्रवादाचे अनेक पैलू आहेत, त्यामुळे शांतता प्रस्थापित होताना दिसत नाही. या स्थितीत पंडितजींच्या राष्ट्रदर्शन या विचारानेच शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते असा विश्वास वैद्य यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, हजारो वर्षाच्या इतिहासात भारतीय राजांनी पाश्चिमात्य राज्यांप्रमाणे कधीही वसाहतवाद, धार्मिक अतिरेकाने साम्राज्यवाद केला नाही किंवा आपले तत्व इतरांवर लादले नाही, यातच भारताचे जगात वेगळेपण सिद्ध होते असेही श्री कृष्ण गोपलजी यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर विशाल भारत विविधतेने समृध्द असून हिंदू धर्म जगभरातल्या भारतीयांना एकात्मतेची शिकवण देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताचे स्व:त्व यावर बोलताना डॉ. मनमोहन वैद्य यांनी भारतीय संस्कृती भिन्न नाही, पण सांस्कृतिक आचार आणि सादरीकरण वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले. सेवाभाव हा भारतीयांच्या अंगी असलेला मूळ स्वभाव त्यांना इतरांपासून विशिष्ट ठरवतो असेही वैद्य यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या पंडित दीनदयाळ 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले की, पुढील वर्षभर हा महोत्सव सुरू राहणार आहे. राज्यातील तरुणांपर्यंत पंडितजींच्या एकात्म मानवदर्शन हे विचार पोहचवले जाणार आहेत. या विचारांमुळे भारत विश्वगुरू बनणार यात किंचितही शंका नाही. केवळ प्रगतीच नाही, तर विश्व कल्याणाचा मूलमंत्र भारतीय तरुणांनी अंगिकारला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीर मधल्या पहलगाम इथे दहशतवाद्यांच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
या महोत्सवातल्या सकाळच्या सत्रात जनसंघ ते भाजपपर्यंतची संघटन यात्रा या विषयावरही विचार मंथन करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिर्बन गांगुली यांनी आपले विचार मांडले. स्वातंत्र्यानंतर अतिशय अडचणीच्या काळात हिंदूंच्या हक्कांवर गदा येत असताना लोकशाही मूल्यं जपण्यासाठी मुखर्जी यांनी जन संघाची स्थापना केली. तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी तब्बल १७ वर्ष अंत्योदय या तत्वावर आधारित संघाची धुरा सांभाळली. आजही सामान्यांच्या हितासाठी भाजप ' अंत्योदय ' याच संकल्पनेवर कार्यरत असल्याचे या मान्यवरांनी सांगितले. या कार्यक्रमाला तामिळनाडू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पी. कनगसभापति ही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment