
मुंबई - मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ ची दुप्पट भाडेवाढ करण्यामागे मुंबईकरांची स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडीत काढण्याचा सरकार व पालिका प्रशासनाचा डाव असून सदर भाडेवाढीस समाजवादी पक्षाचा तीव्र विरोध आहे. भाडेवाढीविरोधात समाजवादी पक्ष रस्त्यावर उतरुन संघर्ष करेल, असा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार व मुंबई महापालिकेतील माजी गटनेते रईस शेख यांनी दिला आहे.
यासदंर्भात आमदार रईस शेख म्हणाले, मुंबई महापालिका प्रशासनाने ‘बेस्ट’च्या दुप्पट भाडेवाढीस नुकतीच मंजुरी दिली आहे. परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर सदर भाडेवाढ तत्काळ अंमलात येणार आहे. सध्या ५ किमी अंतराला असलेले ५ रुपये भाडे १० रुपये होणार असून ही मुंबईकरांची सरळसरळ फसवणूक आहे.
‘बेस्ट’ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. जगभराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोट्यात आहेत. मात्र सरकार अनुदान देवून तो तोटा सहन करते. बृहन्मुंबई महापालिकेने यंदा ७४ हजार ४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. ‘बेस्ट’चा वार्षिक तोटा जेमतेम १५०० कोटी रुपये आहे. तो पालिका प्रशासनाने द्यावा, अशी मागणी आमदार शेख यांनी केली.
पालिका प्रशासनाची मुंबईत २ लाख कोटींची विकासकामे सुरु आहेत. रस्ते सुशोभीकरण, सिमेंट रस्ते यावर पालिका हजारो कोटी खर्च करत आहे. ‘बेस्ट’मध्ये सामान्य मुंबईकर प्रवास करतो. ‘बेस्ट’ भाडेवाढीचा फटका सामान्यांना बसणार आहे. श्रीमंतांसाठी किनारा रस्ता, अटल सेतु, समृद्धी महामार्ग असे लाखों कोटींच्या सुविधा निर्माण करत असताना ‘बेस्ट’साठी मात्र राज्य सरकारने हात आखडता घेतल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला.
‘बेस्ट’ प्रशासनाकडे स्वमालकीच्या अवघ्या १०८५ गाड्या असून त्यातील निम्म्या जुन्या आहेत. ‘बेस्ट’चे महसुली उत्पन्न ८४५ कोटींचे भोडवाढीनंतर १४०० कोटी होईल. मात्र ६०० कोटींसाठी तुम्ही २० लाख मुंबईकर ‘बेस्ट’ प्रवाशांना वेठीस धरणार का, असा सवाल करत ‘बेस्ट’ भाडेवाढ प्रकरणी आगामी महापालिका निवडणुकीत सामान्य मुंबईकर सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशारा आमदार रईस शेख यांनी प्रसिद्ध पत्रकात दिला आहे.
No comments:
Post a Comment