माजी नगरसेवक संजय घाडी, संजना घाडी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 April 2025

demo-image

माजी नगरसेवक संजय घाडी, संजना घाडी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश


1001173010

मुंबई - शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, माजी नगरसेवक नाना अंबोले यांच्यासह उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेते मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. या पक्ष प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षात सर्वसामान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून केले. एकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे लोकाभिमुख योजना या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या निवडणुकीत ८० जागा लढवून ६० जागा जिंकलो तर कोणी १०० जागा लढवून २० जागा जिंकल्या, यावरुन खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. त्यांच्या आरोपाला आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले. बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, सत्ता जाते पण नाव जाता कामा नये, ते नाव टिकवण्याचे काम आपण केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकाऱण या विचारानुसार आपले सरकार काम करतेय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मुंबईत १५ ते २० वर्षांपूर्वी जी कामे व्हायला हवी होती ती आपण मागील अडीच वर्षात सुरु केली. मुंबईत अटल सेतु, कोस्टल रोड झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची विमा सुरक्षा १.५ लाखांवरुन ५ लाख केली. हे काम करणारे सरकार आहे. ही काम करणारी शिवसेना आहे. धनुष्यबाण ही आपली निशाणी आहे. धनुष्यबाण आणि भगवा झेंडा हे आपले इमान आहे, श्वास आहे आणि आपला अभिमान आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिंदे यांनी केलेल्या कामाने प्रभावित होत मूळ शिवसेनेत प्रवेश केला असे माजी नगरसेवक संजय घाडी यांनी यावेळी सांगितले.

नाना अंबोले यांच्यावर वरळी व शिवडी विधानसभेची जबाबदारी -
माजी नगरसेवक नाना अंबोले यांची वरळी आणि शिवडी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. उबाठा उपनेत्या संजना घाडी यांची शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages