मुंबई - मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्ष आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या सयुंक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज "जय भीम पदयात्रे" चे आयोजन करण्यात आले होते. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ९०० हून अधिक स्वयंसेवक आणि एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला. ही प्रेरणादायी पदयात्रा नरिमन पॉईंट येथील बाबासाहेबांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करत, ही पदयात्रा मादाम कामा रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली.
बाबासाहेबांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देण्याच्या सामूहिक प्रयत्नातून काढलेल्या या पदयात्रेत तरुणाईचा जोश आणि समर्पण स्पष्टपणे दिसून आला. यावेळी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालय राज्यमंत्री, रक्षा खडसे यांच्यासह राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री, राजकुमार बडोले, माजी खासदार अमर साबळे यांचा समावेश होता. यावेळी मान्यवरांनी भारताच्या राज्यघटनेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे आणि सामाजिक न्याय आणि समानतेसाठी त्यांनी केलेल्या अथक संघर्षाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच बाबासाहेबांचा वारसा पुढे नेण्यात तरुणांच्या सहभागाचे महत्त्व देखील सांगितले.
मुंबई शहरासोबतच, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या पदयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रांमध्ये स्थानिक पातळीवरील एनएसएस स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय आणि समतेच्या संदेशाचा प्रसार केला. अनेक ठिकाणी प्रभातफेरी, माहितीपर फलक आणि घोषणांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याची महती सांगण्यात आली.
या पदयात्रेच्या आयोजनामध्ये एनएसएसचे क्षेत्रीय संचालक अजय शिंदे, राज्य संपर्क अधिकारी निलेश पाठक, नेहरू युवा केंद्राचे प्रकाश मनुरे यांनी आयोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. पदयात्रेतील युवा पिढीचा हा सक्रिय सहभाग निश्चितच बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे एनएसएसचे विशेष कार्य अधिकारी सुशील शिंदे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment