
मुंबई - कुलाबा येथील ‘रेडिओ क्लब’जवळील जेट्टीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार असून स्थानिक रहिवाशांच्या आक्षेपासंदर्भात समाजवादी पक्षाचे (सप) आमदार रईस शेख यांनी राज्याचे बंदरे व मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना पत्र लिहिले आहे. येथील संभाव्य वाहतूक समस्येचा अभ्यास करण्यासाठी ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (डब्ल्यूआरआय) सारख्या नामांकित संस्थांना सहभागी करावे, अशी विनंती आमदार शेख यांनी केली आहे.
मंत्री राणे यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे की, आपल्यापैकी अनेकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याचे पाहिले आहे. जेट्टी बांधल्याने ही वाहतूक समस्या आणखी वाढू शकते. ज्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आणि स्थानिक रहिवाशांना भविष्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
आमदार रईस शेख पत्रात म्हणतात की, आपल्या विभागाने वाहतूक प्रश्नांसंदर्भात अभ्यास अहवाल बनवला असेल. तरीही, अधिक तपशीलवार वाहतूक अभ्यास करण्यासाठी ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (डब्लुआरआय) सारख्या प्रसिद्ध संस्थांना सहभागी करून घेणे उचित ठरेल. ‘डब्लुआरआय’ संस्थेला वाहतूक व्यवस्थापन आणि शहरी नियोजनाचा व्यापक अनुभव आहे. या संस्थेने ‘नागपाडा जंक्शन’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ येथील जंक्शन सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केलेले आहे. त्यांची तज्ज्ञता ‘रेडीओ क्लब’ येथील सध्याच्या वाहतूक परिस्थितीचे, संभाव्य अडथळ्यांचे आणि त्यावरच्या उपायांचे अचूक निराकरण करण्यात मोठी भूमिका बजावू शकते.
‘डब्ल्यूआरआय’ सारखी नामांकीत संस्था ‘रेडीओ क्लब’ येथील वाहतूक समस्यांचे सखोल संशोधन करू शकते आणि येथील रहिवाशांच्या चिंता दूर करणारे आणि प्रवाशांची गैरसोय कमी करणारे प्रभावी आणि शाश्वत उपाय सुचवू शकते. यामुळे कुलाब्याच्या रेडीओ क्लब जवळील जेट्टीच्या संभाव्य वाहतूक समस्या ओळखण्यास आणि त्या कार्यक्षमतेने सोडवण्यास चांगलीच मदत होईल, अशी सूचना आमदार रईस शेख यांनी मंत्री राणे यांना केली आहे.
No comments:
Post a Comment