मुंबई - विद्यार्थी हे दैवत असून राज्यातील शासकीय शाळांमध्ये समर्पित वृत्तीने काम करणारे अनेक शिक्षक आहेत. राज्य शासन अशा शिक्षकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून सर्वच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी केली जाणार असून येत्या वर्षभरात शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये 25 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाल्याचे दिसून येईल, असे त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. शिक्षण विभागामार्फत काढण्यात येणाऱ्या शासन निर्णयांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि सकारात्मक निर्णयांचा समावेश असावा यादृष्टीने ते अंतिम करण्यापूर्वी त्यांनी शिक्षक संघटनांशी चर्चा केली. या बैठकीत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले, शैक्षणिक गुणवत्तेवर भर देऊन शालेय शिक्षण विभागामध्ये सर्वांच्या सहकार्याने सकारात्मक मार्गक्रमण केले जाणार आहे. संवादातून प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. सीबीएसईचा अभ्यासक्रम स्वीकारताना राज्य शिक्षण मंडळ कायम राहणार असल्याचे सांगून नवीन अभ्यासक्रमात मराठी भाषा, राज्याचा इतिहास, भूगोल यांच्याशी तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे गणवेश स्थानिक पातळीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तथापि ते दर्जेदार असणे आवश्यक आहे. शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करताना जिल्हा नियोजन समितीसह शासनाच्या विविध विभागांच्या निधीचा तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करावा. जिल्हा परिषदेच्या शाळांना सौर ऊर्जा उपलब्ध करुन देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह म्हणाले, शालेय शिक्षण विभाग शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शिक्षकांनीही प्रत्येक विद्यार्थ्यांला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शाळेशी संबंधित बैठका घेताना अथवा शाळेने कोणतीही माहिती देताना शैक्षणिक कामांना बाधा येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment