
मुंबई - भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जात आहे. मंत्रीपदाची शपथ संविधानाच्या कलम 164 (3) नुसार घेताना ज्या संविधानिक कर्तव्याचे पालन करावे, पण ती संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत असा आरोप शिवसेना पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी अॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांच्यामार्फत पाठविलेल्या कायदेशीर नोटीसमधून केला आहे. राणेंच्या भाषणावरुन त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
नितेश राणे हे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री आहेत, परंतु त्यांना कधीच कोणीही परांपरागत मासेमारी करणार्या मच्छिमार कुटुंबातील प्रश्नांबद्दल बोलताना बघितले नाही, त्यांना चांगले शिक्षण मिळावे याबद्दल, कोकणातील धनगर समाजाला शिक्षण मिळावे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्पसंख्यांक समाजातील मुलांना शिक्षण मिळावे, समुद्रातील बेकायदेशीर मासेमारी थांबावी, अनियंत्रीत जलचर उपसा, वाळू तस्करी याबद्दल बोलतांना कुणीच नितेश राणेंना ऐकलेल नाही, परंतु ते सतत अनावश्यक मुद्दे उकरून काढतात आणि सातत्याने सामाजिक प्रदूषण पसरवतात, असे सुद्धा नोटीसमधून म्हणण्यात आले आहे. 13 फेब्रुवारी 2025 रोजी कुडाळ जिल्हा. सिंधुदुर्ग येथे जे भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांनाच विकासनिधी देण्यात येईल अशाप्रकारचे भेदभाव व द्वेषपूर्ण वक्तव्य मागे घेतल्याचे नितेश राणेंनी त्वरीत जाहीर करावे. असे विषमतापूर्ण विधान यानंतर करणार नाही असे सांगावे आणि भारतीय संविधानाचा सन्मान करीत कलम 164 (3) नुसार मंत्रीपदाची घेतलेल्या शपथेचे प्रत्यक्षात पालन करीन असे जाहीर करावे अशी मागणीदेखील नोटीस मध्ये करण्यात आली आहे. सदर कायदेशीर नोटीसेला 15 दिवसात उत्तर देण्यात आले नाही, या विषयावरील महाराष्ट्रातील पहिली केस राज्यपालांच्या कडे दाखल करण्यात येईल असेही अॅड. असीम सरोदे यांनी नोटीसमधून म्हटले आहे.
महाराष्ट्रामध्ये सर्वत्र एकात्मता व बंधुभाव याविरोधात वातावरण निर्माण हिंसकता पसरविण्याबद्दल नीतेश राणे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याबाबतचा उल्लेख नोटीस मध्ये करण्यात आला आहे. मंत्री झाल्यावरसुद्धा नितेश राणे अशाच प्रकारे वक्तव्य करून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणण्याचे कार्य करीत असल्याने सुद्धा कलम 164(3) नुसार त्यांनी घेतलेल्या संवैधानिक शपथेचाच नाहीतर, संविधानाची मांडणी करण्यार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा नितेश राणे अपमान करत आहेत असा आरोप नोटीस द्वारे करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment