मुंबई - मुंबईकरांना त्यांच्या जलजोडणीची जलदेयके भरता यावीत यासाठी शनिवार दिनांक २९ मार्च २०२५, रविवार दिनांक ३० मार्च २०२५ या साप्ताहिक सुटी आणि सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तरी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा व सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी जलदेयकांचा भरणा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचा (Water Bills) भरणा जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत करणे बंधनकारक आहे. एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. तथापि, या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी ‘अभय योजना’ सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत जलदेयकातील प्रलंबित अतिरिक्त आकारापासून विशेष सूट देण्यात येत आहे.
दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी आर्थिक वर्षअखेर आहे. सबब, अधिकाधिक नागरिकांना जलदेयकांचा भरणा करता यावा यासाठी शनिवार दिनांक २९ मार्च २०२५, रविवार दिनांक ३० मार्च २०२५ या साप्ताहिक सुटीच्या दिवशी आणि सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद निमित्त सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी, जलजोडणीधारकांनी, शासकीय - निमशासकीय कार्यालयांनी थकीत जलदेयकांचे दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी अधिदान करावे आणि अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment