सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने शिवाजी नाट्य मंदिरकडून छत्रपतींचा एकेरी उल्लेख बंद - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

26 March 2025

demo-image

सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने शिवाजी नाट्य मंदिरकडून छत्रपतींचा एकेरी उल्लेख बंद

1001132147

मुंबई - दादर येथे सुप्रसिद्ध असे शिवाजी नाट्य मंदिर आहे. नाट्य मंदिराच्या नावामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला जात होता. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार असलेल्या रवींद्र जाधव कोतापकर यांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिवाजी नाट्य मंदिरचे 'श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर' असे नामांतर करण्यात आले आहे.  

श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट मुंबई या संस्थेची 31 डिसेंबर 1943 रोजी स्थापना करण्यात आली. दादर पश्चिम येथे या ट्रस्टचे शिवाजी मंदिर नाट्यगृह आहे. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या या नाट्यगृहाने अनेक नाट्य कलाकार घडविले. नाट्यगृहाला अनेक राजकीय सामाजिक कला व पत्रकारिता या क्षेत्रातील नामवंत, विचारवंत व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. परंतू नाट्य मंदिराच्या नावामुळे शिवरायांचा एकेरी उल्लेख होत असल्याची बाब कोणाच्याही निदर्शनास आली नाही. 

नाट्यगृहाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण करून नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात आले. परंतु त्याचे नाव मात्र बदल न करता पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असल्याने कोतापूर गावचे सुपुत्र पत्रकार रवींद्र बाबाजी जाधव रवि कोतापकर व त्यांचे मित्र दीपक घेवदे यांनी नाट्य मंदिराच्या ट्रस्टला 14 जानेवारी 2023 रोजी पत्र दिले होते. याबाबत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांना पत्र लिहिले होते. त्याची कोणीही दखल घेतली नाही. 

शिवरायांच्या अवमानाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याने रवींद्र जाधव कोतापकर व त्यांचे मित्र दीपक घेवदे यांनी 22 जुलै 2024 रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली. तक्रारीच्या सुनावणी दरम्यान ट्रस्टकडून तक्रारदारांना कागदपत्र तसेच माहिती देण्यास चालढकल करण्यात आली. अखेर धर्मादाय आयुक्त ट्रस्टच्या विरोधात निकाल देण्याआधीच ट्रस्ट आणि नाट्य मंदिराच्या नावात बदल करण्यात आला आहलल. शिवजयंतीच्या मुहूर्तावर नाट्यगृहाच्या नावात श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर असा सन्मान जनक बदल करण्यात आला. तसे लेखी पत्र तक्रारदार रवींद्र जाधव व धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले. शिवरायांचा एकेरी उल्लेख करणे आता बंद झाल्याने रवींद्र जाधव यांचे अभिनंदन केले जात आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages