मुंबई - चिमण्यांची संख्या कमी होत असल्याचे अभ्यासकांच्या पाहणीतून निदर्शनास आल्यामुळे १६ वर्षांपासून २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस (world sparrows day) साजरा करण्यास सुरुवात झाली. मानव जेव्हापासून वस्ती करून राहू लागला तेव्हापासून त्यांच्या आजूबाजूला चिमणीचा अधिवास आहे. त्यामुळे चिमण्यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा ‘इंडियन स्पॅरोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे व नेचर फॉरएव्हर सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद दिलावर यांनी व्यक्त केली. (Protect and conserve sparrows)
जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका व नेचर फॉरएव्हर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन इमारत सभागृहात आज (दिनांक २० मार्च २०२५) एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मोहम्मद दिलावर बोलत होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (उद्याने) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, मार्गदर्शक सुजीत पाटील आदींसह पर्यावरणाचे अभ्यासक यावेळी उपस्थित होते.
दिलावर यांनी ‘स्पॅरो कॉन्झर्व्हेशन अलायन्स’ उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय आणि खासगी संस्थांच्या सहकार्याने आर्थिक मदत मिळवून चिमण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले. या वेळी ‘आय लव्ह स्पॅरो’ या मोहिमेचीही माहिती देण्यात आली. चिमण्यांच्या संवर्धनासाठी मोफत घरटे व अन्न सेवा सुविधा पुरवण्याबाबतही चर्चा झाली.
चिमण्यांच्या संवर्धनासाठी घराबाहेर पाण्याचा घडा ठेवा, नेस्ट बॉक्स आणि फीड बॉक्स बसवा, पार्किंग लॉट आणि सोसायटीमध्ये नेस्ट बॉक्स ठेवा, असे आवाहनही या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आले.
No comments:
Post a Comment