मुंबई - मिठी नदीतील गाळ काढण्याबावत आणि मुंबई शहारातील मोठ्या नाल्यातील साफसफाई करण्याच्या ५०० कोटी रुपयांच्या निविदेतील घोटाळ्याची पुराव्यानिशी पोलखोल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांचं नेमकं काय साटलोटं आहे? त्यांची नेमकी मोडस ॲापरेंडी कशी आहे ते नांदगांवकरांनी सांगितलं.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहर आणि उपनगरामधील मोठ्या नाल्यांच्या सफाईकरता तसंच मिठी नदी मधील गाळ काढण्याकरता निविदा काढल्या आहेत .
• हे टेंडर तब्बल ५०० कोटी रुपयांचं आहे.
• त्यातील ४०० कोटी रुपयांचं टेंडर अगोदरच कॉन्ट्रॅक्टरच्या संगनमताने (जादा दराने) ओपन केलं आहे.
• तर दोन दिवसांपूर्वी म्हणजे ३ मार्च रोजी मिठी नदी सफाई करता १०० कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे.
या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर बाळा नांदगांवकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्तांनाही पत्र पाठवलंय.
मुंबईतील मोठ्या नाल्यांची सफाई आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदेमध्ये एकाच कंत्राटदाराने त्याच्या ४ ते ५ कंपन्यांसह निविदा दाखल केली. या कंत्राटदारांनाच सदर काम मिळावं यासाठी अटी, शर्तींमध्ये कमालीचे बदल करण्यात आले. जेणेकरून विशिष्ट कंत्राटदारालाच ते टेंडर मिळू शकतं.
केवळ डिस्लटींग काम करणाऱ्या कंपनीला निविदा दिली जावी अशी अट त्यात आहे. त्यात एकाच कंत्राटदाराच्या १) डी.बी. इंटरप्रायझेस, २) एन.एस. रनोजा डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ३) त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट, ४) तनिषा इंटरप्रायझेस यांनांच काम मिळेल अशाप्रकारची अट टाकून महानगरपालिका आणि सरकारचे नुकसान केले जात आहे. कारण हे सर्व टेंडर जास्त किंमतीने (Above) दिले जात आहे. त्यामुळे महानगरपालिका व सरकारचे किमान २५० कोटींचे नुकसान होत आहे. कंत्राटदाराला १ टन गाळ काढून तो उचलण्यासाठी साधारणतः ₹.१,०००/- ने खर्च होत आहे. मात्र महापालिका त्यां कंत्राटदाराला
रु.२,५००/- अदा करते. त्यामुळे महापालिकेचं प्रति टन ₹.१,५००/- चं नुकसान होत असल्याचं बाळा नांदगांवकर यांनी दाखवून दिलं.
ही जनचेच्या पैशांची लूट होत आहे. हा पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करून, एसआयटी नेमून या भ्रष्टाचाराची चौकशी करावी असं नांदगांवकर म्हणाले. महापालिकेतील रामगुडे नावाचा असिस्टंट इंजिनियर, केतन कदम नावाचा मशिन सप्लायर, भूपेंद्र, नंदीश नावाचे कंत्राटदार अशा या घोटाळाबहाद्दरांची नावंच नांदगांवकरांनी उघड केली. दोषी कंत्राटदार, महापालिका अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदगांवकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment