
मुंबई - रिपब्लिकन पक्षाने सत्ता मिळवली पाहिजे, सत्तेतील हक्काचा वाटा मिळत नसेल तर सत्तेचा वाटा हिसकावुन घेण्याची आपल्यात ताकद असली पाहिजे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत जर एखादी महत्वाची जागा सुटत नसेल तर त्या जागेवर स्वबळावर बंड करून निवडुन येण्याची ताकद रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुलुंड येथील महाकवी कालीदास नाट्यगृह येथे केले.
रिपब्लिकन पक्षाच्या ईशान्य मुंबईच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाने प्रचंड शक्ती प्रदर्शन केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रामदास आठवले बोलत होते.
शिवसेना भाजप यांच्यातही युती असुन तिकीट वाटपात मोठी भांडणे होतात. ती टोकाची भांडणे होवुन त्याच्या बातम्या होतात. अनेक उदाहरण अशी आहेत की शिवसेना भाजपने सुध्दा बंडखोरी करून आपल्या कार्यकर्त्यांना निवडुन आणले आहे. सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांचे समाधान होत नाही. मात्र जिथे ताकद आहे तिथे रिपब्लिकन पक्षाला जागा सुटलीच पाहिजे. माझ्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांना महापालिकेत निवडुन येवुन नगरसेवक होताना पाहायला मला आवडेल. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडुन येण्याची ताकद ठेवली पाहिजे. त्यासाठी आपल्या प्रभागात काम केल पाहिजे. जुन्या कार्यकर्त्यांनी सळसळत्या रक्ताच्या नव तरुणांना संधी दिली पाहिजे. आपआपल्या भागात सर्व सामाजिक प्रश्नांवर आवाज उचलला पाहिजे. लोकांना न्याय मिळवुन देण्यासाठी काम केल पाहिजे, अन्याय होत असेल तर तुम्हाला राग आला पाहिजे, आणि त्यातुन तुम्ही आंदोलन उभारून जेलमध्ये जायची तयारी ठेवली पाहिजे. निडर होऊन पँथरसारखी न् अन्यायाविरुध्द झेप घ्या, असे आवाहन आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.
बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचेच आहे. महाबोधी टेंपल एक्ट नुसार त्यात ४ ट्रस्टी हिंदु आहेत. बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार हे फक्त बौध्दांचे आहे. त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे ट्रस्ट बौध्दांनाच दिले पाहिजे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुरोगामी आहेत. त्यांच्यावर ही ऐतिहासीक जबाबदारी आहे. त्यांनी महाबोधी टेंपल कायदा रद्द करुन महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात दिले पाहिजे. जर महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात दिले जात नसेल तर महाबोधी महाविहाराचा ताबा हिसकावुन घेण्याची ताकद बौध्दांमध्ये आहे. हे आम्ही दाखवुन देवु असा इशारा आठवले यांनी यावेळी दिला.
No comments:
Post a Comment