मुंबई - मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात सखल भागातील पाणी साचण्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे. पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणांची संयुक्त पाहणी करून उपाययोजना आखाव्यात. योग्य समन्वय राखून योगदान द्यावे. उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरु राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना दिले.
यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक २८ मार्च २०२५) बैठक संपन्न झाली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, मुंबई इमारत व पुनर्वसन मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्यासह सातही परिमंडळांचे उप आयुक्त, सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तट रक्षक दल, नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), मुंबई वाहतूक पोलिस, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक (बेस्ट), टाटा पॉवर, अदानी एनर्जी आदींच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून कामकाज केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कल्व्हर्टच्या स्वच्छतेची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणाऱया ठिकाणी भूमिगत जल - साठवण टाक्यांची उभारणी केली. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने सर्व कामे करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले. तसेच, रेल्वेमध्ये सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा सज्ज ठेवावी. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील विविध कामे आणि मेट्रो रेल्वे इत्यादी प्रकल्पांच्या ठिकाणी कोणताही राडारोडा पडून राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. प्रत्येक विभागातील सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील राडारोडा काढण्यासाठी त्या-त्या यंत्रणेशी समन्वय साधावा. तसेच, वाहतूक पूर्ववत होण्याकामी, स्थानिक कामे झाल्यावर बॅरिकेड्स काढावीत, याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
जोरदार पावसाच्या काळात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यंदादेखील शहर आणि उपनगरात मिळून ४८२ ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत. त्यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात २५ विभाग पातळीवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. हे समर्पित नियंत्रण कक्ष आवश्यक मनुष्यबळ व सर्व उपकरणांसह सुसज्ज ठेवावेत, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या.
मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असलेली संभाव्य ठिकाणे आहेत. याठिकाणी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच, संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना द्याव्यात, आपत्तीसमयीचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देशदेखील आयुक्तांनी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, कीटक नियंत्रण विभाग, आणि प्रमुख रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जलजन्य आजार, साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देखील गगराणी यांनी दिले.
या बैठकीला उपस्थित असणाऱया राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) अधिकाऱयांनी पावसाळ्याच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफची पथके सज्ज असणार आहेत. भारतीय नौदलालाही त्यांची पथके आणि पाणबुडे (डायव्हर्स) यासह सुसज्ज राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अग्निशमन दलानेही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले.
No comments:
Post a Comment