मुंबई - जागतिक क्षयरोग दिन २०२५ वर्षासाठीचे घोषवाक्य "होय! आपण टीबी निश्चित संपवू शकतो: प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या" हे आहे. नजीकच्या काळात प्रकाशित अहवालानुसार, मुंबईमध्ये औषध-प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारांचा यशाचा दर ८०% आहे, जो गेल्या आठ वर्षांत दुप्पट झाला आहे. हे गुणवत्ताधारित निदान सेवेमध्ये सातत्याने सुधारणा, नवीन औषध उपचार पद्धती आणि BMC आरोग्य विभागाने DRTB रुग्णांना प्रदान केलेल्या मार्गदर्शन व सहाय्यामुळे शक्य झाले आहे.
"टीबी मुक्त विभाग" आणि "टीबी मुक्त मुंबई" हे ध्येय साध्य करण्यासाठी विभागनिहाय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा विभागनिहाय पातळीवर सज्ज झाली आहे.
वर्ष २०२४ मध्ये, मुंबईमध्ये एकूण ६० हजार ६३३ क्षयरोगाचे रुग्ण आढळले, त्यापैकी ५३ हजार ६३८ क्षयरोगाचे रुग्ण मुंबईत वास्तव्यास होते. एकूण रुग्णांपैकी ३८ टक्के हे फुफ्फुसा व्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आणि ६ टक्के बालरुग्ण होते. तर ९% हे औषध-प्रतिरोधक रुग्ण होते.
क्षयरोग नियंत्रणासाठी हाती घेतलेले विशेष उपक्रम
1. १०० दिवस मोहिम –
◦ केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सूचना आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ विभागांमध्ये ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यंत "१०० दिवसांची मोहीम" राबविण्यात आली आहे.
◦ या मोहिमेचे उद्दिष्ट क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेण्याचा वेग वाढवणे, क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्युदरात घट करणे आणि नवीन रुग्ण टाळण्यासाठी क्षयरोगाचा प्रसार रोखणे हे आहे.
◦ मोहिमेअंतर्गत १५ लाखांहून अधिक उच्च जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये "Presumptive TB" (संभाव्य टीबी) रुग्णांसाठी तपासणी करण्यात आली आहे.
◦ ६०,९४४ NAAT चाचण्या पार पडल्या असून निदानासाठी मोबाइल X-रे व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत.
2. निदान सुविधांचे अद्ययावतकरण –
◦ मुंबईत ४४ CBNAAT आणि ३४ TruNAAT मशीन उपलब्ध आहेत, जे औषध-प्रतिरोधक क्षयरुग्णांसह सर्व क्षयरुग्णांसाठी मोफत, उत्कृष्ट निदान सेवा प्रदान करतात.
◦ GTB रुग्णालय, शिवडी येथील कल्चर आणि DST प्रयोगशाळा इंटरमीडिएट रेफरन्स लॅबोरेटरी (IRL) मध्ये अपग्रेड करण्यात आली आहे, जिथे दररोज ५०-६० कल्चर आणि औषध संवेदनशीलता चाचण्या (DST) होतात.
◦ कस्तुरबा रुग्णालयामध्ये टीबी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्याने टीबी निदान क्षमतेत वाढ झाली आहे.
3. सर्व क्षयरुग्णांसाठी 'Differentiated TB Care' –
◦ मुंबईत सर्व क्षयरुग्णांचे निदान करताना, उच्च जोखीम असलेल्या घटकांची ओळख पटवून, योग्य व्यवस्थापनासाठी आणि उपचारातील परिणाम सुधारण्यासाठी "Differentiated TB Care" सेवा प्रदान केली जाते.
◦ या उपक्रमांतर्गत ११,३४९ क्षयरुग्ण नोंदणीकृत झाले आहेत.
4. औषध-प्रतिरोधक क्षयरुग्णांसाठी BPaLM उपचारपद्धती –
◦ मुंबईत सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील ३१ DRTB क्लिनिक्स औषध-प्रतिरोधक क्षयरोगासाठी मोफत अँटी-TB उपचार प्रदान करतात.
◦ Rifampicin/MDR-TB रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी, केवळ ६ महिन्यांच्या कालावधीसाठी असलेली BPaLM औषधोपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
◦ आतापर्यंत ४३ औषध-प्रतिरोधक क्षयरुग्णांवर BPaLM उपचार सुरू करण्यात आले असून, लवकरच इतर पात्र रुग्णांनाही ही औषधोपचार पद्धती सुरू केली जाईल.
5. क्षयरोग निदानासाठी WGS तंत्राचा वापर –
◦ WGS (Whole Genome Sequencing) ही अत्याधुनिक आण्विक चाचणी आहे, ज्यामुळे १८ क्षयरोग प्रतिरोधक औषधांसाठी विविध प्रकारच्या उत्परिवर्तनांची (mutations) माहिती मिळते.
◦ बृहन्मुंबई महानगरपालिकेने २४८४ नमुन्यांवर WGS साठी पायलट चाचणी केली आहे.
6. हँडहेल्ड X-रे मशीन –
◦ राज्य क्षयरोग विभागामार्फत मुंबईला २४ हँडहेल्ड X-रे मशीन प्रदान करण्यात आली आहेत, ज्यांचा उपयोग क्षयरोग निदानासाठी केला जात आहे.
7. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपक्रम –
◦ डिसेंबर २०२४ पासून मुंबईतील १२ इंटरव्हेन्शनल विभागांमध्ये ICMR च्या सहकार्याने प्रौढ BCG लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
◦ मार्च २०२५ पर्यंत १६ हजार ७३५ लाभार्थ्यांना BCG लसीकरण देण्यात आले आहे.
8. क्षयरोग रुग्णालय, शिवडीचे अद्ययावतकरण –
◦ GTB रुग्णालयात १० खाटांचे "इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट (IRCU)", स्वतंत्र बालरोग क्षयरोग वॉर्ड, पॅलिएटिव्ह वॉर्ड, पल्मोनरी रिहॅबिलिटेशन सेंटर (PRC) आणि मॉड्युलर OT सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
9. पोषण आहार –
◦ "नि-क्षय मित्र" उपक्रमांतर्गत, सर्व क्षयरुग्णांना सहा महिन्यांसाठी दरमहा पोषण आहार दिला जातो, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
◦ मागील २ वर्षांत १,१८,६३३ लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहे.
जागतिक क्षयरोग दिन २०२५ निमित्त मुंबईत राबवले जाणारे उपक्रम –
• बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ विभागांमध्ये क्षयरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत बाईक रॅली, मॅरॅथॉन, पथनाट्य, आरोग्यविषयक व्याख्याने आणि जिंगल्सद्वारे माहिती दिली जाईल.
• क्षयरोगाच्या संपर्कातील व्यक्तींना जागरूक करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.
क्षयरोगाची १० प्रमुख लक्षणे –
२ आठवड्यांहून अधिक कालावधीचा खोकला, ताप, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, दम लागणे, खोकताना रक्त येणे, थकवा आणि मानेवर गाठ येणे अशी आहेत. वरील लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या BMC दवाखान्यात मोफत तपासणी करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment