होलिका दहन व धुळवड / रंगपंचमी आनंदाने, जबाबदारीने साजरी करा - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

12 March 2025

demo-image

होलिका दहन व धुळवड / रंगपंचमी आनंदाने, जबाबदारीने साजरी करा

bmcjpn

मुंबई - होलिका दहन आणि धुळवड/रंगपंचमी हे सण मुंबईकर नागरिकांनी आनंदाने आणि जबाबदारीने साजरे करावेत. होळी सणासाठी नागरिकांनी झाडे अथवा झाडांच्या फांद्या तोडू नयेत. तसेच, रंगांचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्‍यावी. धूलिवंदन/ रंगपंचमीकरीता पाण्याचा शक्‍यतो वापर टाळावा. मुंबई महानगर स्वच्छ व निरोगी ठेवण्‍यासाठी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे,असे विनम्र आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी व अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.
 
गुरूवार, दिनांक १३ मार्च २०२५ रोजी होळी सण साजरा करण्यात येणार आहे. होलीका दहनासाठी कोरड्या लाकडाचा वापर करून होळी दहन पारंपरिक पद्धतीने साजरे करावे. वृक्षतोड करू नये. रासायनिक घटक वापरुन रंगवलेले लाकूड, प्लास्टिक, रबर, टायर आणि अन्य घातक पदार्थ दहन करताना टाळावे. त्यातून निर्माण होणारा धूर आणि प्रदूषण आरोग्यास हानिकारक असतात, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. गृहनिर्माण सहकारी संस्‍‍था (सोसायटी) आणि स्‍थानिक समुदायांनी पर्यावरणपूरक पद्धतीने होलिका दहनाचे आयोजन करावे.

होळी दहनाची परंपरा जपताना पर्यावरणाचे संरक्षण करावे. मुंबईत आपल्या अवतीभोवती असलेली निसर्ग संपदा जोपासणे आणि वृद्धिंगत करणे, हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आपणा सर्वांना प्राणवायू देणाऱया झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.
 
होळीच्या दुसऱया दिवशी म्हणजेच शुक्रवार, दिनांक १४ मार्च २०२५ रोजी साजरा होणारा ‘धूलिवंदन’हा सण सर्व नागरिकांना एकाच धाग्यात गुंफणारा तसेच नवचैतन्य निर्माण करणारा आहे. मुंबईकर नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून या दिवशी पाण्याचा अपव्‍यय टाळावा. पर्यावरणपूरक (Eco-Friendly) नैसर्गिक रंगांचा वापर करावा. त्वचेसाठी सुरक्षित असेलेले आणि मुलांसाठीदेखील निरूपद्रवी असेलेले नैसर्गिक व सेंद्रिय रंग वापरावेत. कृत्रिम रंगांमध्ये रसायने आणि जड धातूंचा अंतर्भाव असल्‍याने त्‍यांचा वापर करणे टाळावे. शक्य तितक्या कोरड्या रंगांचा वापर करत पाणी बचत करावी.

होलिका दहन आणि धुळवड/रंगपंचमी सणाचा आनंद द्विगुणीत करताना ध्‍वनी प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घ्‍यावी. विशेषतः रुग्णालये, निवासी भाग आणि संवेदनशील ठिकाणी आवाज पातळी मर्यादीत ठेवावी, असे आवाहनदेखील महानगरपालिका प्रशासनाकडून समस्त मुंबईवासियांना करण्‍यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages