
मुंबई - लाडक्या बहिणींना अपात्र करणारे लाडके भाऊ मतं परत करणार का असा हल्लाबोल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभ मेळ्यात गंगेत पूर्ण कपडे घालून स्नान केल्याची खिल्ली उडवत भाजपाचा समाचार घेतला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिवबंधन या कार्य अहवालाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे रेनकोट घालून स्नान करायचे अशी टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभ मेळ्यात गंगेत पूर्ण कपडे घालून स्नान करतात, अशी खिल्ली त्यांनी उडविली. तसेच सतत हिंदुत्वावरून टीका करणाऱ्यांचा ठाकरे यांनी मी भाजपला सोडलं हिंदुत्ववादाला नाही अशा शब्दांत समाचार घेतला.
शिवसेनेचे खासदार फोडण्यावरील बातमीवरून ही त्यांनी शिंदेंना सर्व यंत्रणा बाजूला ठेवून आणि कोणताही दबाव न आणता पक्ष फोडुन दाखवा, असे आवाहन देखील केले. मुख्यमंत्री पद, मंत्री पदे, पालकमंत्री पद यावर सत्ताधाऱ्यांच्या सुरू असलेल्या खेचाखेचीवरूनही त्यांनी चिमटा काढला.
बांगलादेशी नागरिकांना राज्यात रेशनकार्ड उपलब्ध होत असल्यावरून टीका केली. तसेच लोकसंख्या पेक्षा मतदार वाढले कसे यावर प्रश्न उपस्थित करत त्यांना वगळता येणं आता शक्य नसल्याचे म्हणत त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
आमच्या पंतप्रधानांना इतिहास आणि अभ्यासाच वावडं आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली. अंबादास दानवे यांच्या कार्य अहवालच्या मुख पृष्ठावर त्यांचेच मनगट आहे, तर काही लोकांना शिवबंधन बांधण्यासाठी मनगट भाड्याने घ्यावे लागतात, अशी टीका राऊत यांनी पक्ष सोडून केलेल्यांवर केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उत्तम काम करत असल्याची प्रशंसा उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेत एकच लाल दिवा मिळाला आहे तो दानवे यांच्याकडे आहे. सरकार सत्तेत येईन आणि आपल्याला लाल दिवा मिळेल, असे अपेक्षित असताना तसे घडले नाही मात्र आपल्याकडे असलेला एकच लाल दिवा सर्वांना भारी आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रशंसा केली.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार, माजी नगसेवक, उपनेते, सचिव, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, माजी नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment