राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2025

demo-image

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1000916414

मुंबई - 'महालक्ष्मी सरस' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर  दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात उमेद मॉल तयार करणार आहोत. त्याचं बरोबर राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई  येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू  राहणाऱ्या “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५” चे उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, उमेदचे मुख्य परिचलन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'महालक्ष्मी सरस' हा गेली २१ वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे. ‘उमेद’ अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे. 'उमेदच्या' माध्यमातून 'महालक्ष्मी सरस' हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात. पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारणार. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बचत गटांमार्फत तयार केलेली वस्तू ही खाजगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असून ती अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात. ‘उमेद’च्या माध्यमातून ६० लाखापेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत. या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी‘ही योजना आणली आहे.ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना 'लखपती दीदी' म्हटले जाते. आज महाराष्ट्रात ११ लाख पेक्षा जास्त 'लखपती दीदी'आहेत. लवकरच २५  लाख महिलांना 'लखपती दीदी' करण्याचा शासनाचा मानस आहे. आगामी कालावधीत एक कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. स्त्रीशक्ती ही आर्थिक विकासाला गती देणारी एक महाशक्ती होईल. बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, लाडकी बहिण योजना, एस. टी. मध्ये प्रवास सवलत यासह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत.लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बचत गटांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासन आग्रही आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित माल विक्रीचे हमखास ठिकाण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी  मॉल उभारणार. तालुक्यात देखील विक्री  केंद्र सुरू करण्यात येतील. बचत गटांसोबतच वैयक्तिक कर्ज देण्यासाठी निर्णय झाला पाहिजे. आज उमेद अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन” आयोजित केले जाते या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन मंत्री गोरे यांनी सांगितले.

ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, ‘उमेद’च्या माध्यमातून गेली २१ वर्षे सरसच्या माध्यमातून  महिलांना खुली बाजारपेठ उपलब्ध करून महिलांना प्रोत्साहन दिले जाते. महिला अर्थिक स्वावलंबी झाल्या पाहिजेत. यामध्ये ६० लाखापेक्षा अधिक लाख कुटुंबे जोडली गेली आहेत. अजूनही यामध्ये सुधारणा करायला वाव आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रत्येक जिल्ह्यावर मार्केटिंग व्हावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘महिला सरस’ला राज्यभरातून मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त आहे. एकूण ४७९ स्टॉल्स आहेत. २५ टक्के अन्य राज्यातील महिला बचत गट देखील ‘सरस’मध्ये सहभागी आहेत. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात बचत गटांच्या उत्पादनांची विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वैविध्य पूर्ण उत्पादने, ग्रामीण कला, संस्कृतीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. आभार ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी मानले.

प्रदर्शन ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान -
सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला ११ ते २३ फेब्रुवारी,  या कालावधीत भेट देता येईल. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल  आहे. या प्रदर्शनात एकूण ५०० पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत, त्यापैकी ९० फुड स्टॉल आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages