
मुंबई - श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या फुगवलेल्या अर्थसंकल्पातून सत्ताधारी महायुतीमधील पक्षातील लोकप्रतनिधींना निधी दिला जातो. हा निधी कोणतीही कामे न करता कंत्राटदारांना देण्यात आला. याच निधीमधून निवडणुका लढवल्या जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पा संदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राखी जाधव बोलत होत्या. यावेळी राखी जाधव म्हणल्या की, मुंबई पालिकेत नगरसेवक असताना मुंबईकर जो कर भरतात त्यामधून पालिका प्रकल्प पूर्ण करत होते. पालिकेत गेले तीन वर्षे प्रशासक आहेत. सरकार आणि प्रशासक पालिकेच्या ठेवी तोडून प्रकल्पाचा खर्च करत आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याच्या जाहिरातीही पालिकेच्या तिजोरीतून केल्या जात आहेत. असेच सुरू राहिले तर येत्या काळात पालिकेवर आर्थिक संकट येवू शकते. हा मुंबईसाठी मोठा धोका आहे. नागरिकांना सोयी सुविधा देणारी मुंबई पालिका टिकली पाहिजे. अर्थसंकल्पात फुगीर तरतूद केली जाते. नुसता भास निर्माण करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, बेस्ट उपक्रम पालिकेत विलीन करावा अशी आमची मागणी होती. बेस्टचे विलीनीकरण झाले असते तर मुंबईकरांना चांगल्या पद्धतीने परिवहन सेवा उपलब्ध झाली असती. पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात नाममात्र तरतूद करण्याऐवजी भरीव तरतूद करण्याची गरज आहे. प्रशासन सोयीचे काम करत आहे. वेळ पडल्यास बेस्ट वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारले जाईल. आरोग्य विभागासाठी तरतूद केली जाते. मात्र नागरिकांना रुग्णालयात बेड मिळत नाहीत. पालिकेने आपला दवाखाना सुरू केला. मात्र डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने आजही अनेक ठिकाणी हे दवाखाने बंद आहेत. आरोग्य सेवा अद्ययावत करू शकलो का याचे ऑडिट करण्याची गरज आहे.
त्या पुढे असेही म्हणाल्या की, बांधकामाच्या माध्यमातून पालिकेला शाळा मिळत आहेत. अशा शाळांमध्ये पटसंख्या नसल्याने त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होत नाही. अशा शाळांच्या जागांचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा म्हणून लायब्ररीमध्ये रुपांतर करावे. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यावर नागरिकांची गैरसोय होते. सखल भागात आजही पाणी साचते. नदी नाल्यांचे नियोजन करण्यात पालिका अपयशी ठरली आहे.
No comments:
Post a Comment