मुंबई - इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पित उत्तुंग पुतळ्याच्या नमुना प्रतिकृतीचे छायाचित्र पाहिले. खूप दुःख झाले, असे सांगतानाच तो पुतळा कोणत्याही कोनातून बाबासाहेब वाटत नाही. त्यांची ही शुद्ध विटंबना आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पँथर - रिपब्लिकन नेते, माजी राज्यमंत्री दयानंद मस्के यांनी व्यक्त केली आहे.
बाबासाहेबांचा चेहरा, व्यक्तिमत्व आणि पेहेरावाशी विसंगत असलेला हा नमुना पुतळा स्विकारण्याजोगा नाही. त्याला कोणीही मान्यता देवू शकत नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.
सध्या पुण्यात वास्तव्य असलेले मस्के हे स्वतः निवृत्त कला शिक्षक असून जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये तयार झालेले शिल्पकार आहेत. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नमुना प्रतिकृतीवरील त्यांच्या अभिप्रायाला विशेष महत्व आहे.
काँग्रस आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री राहिलेले दयानंद मस्के हे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे अगदी सुरुवातीपासूनचे निकटचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राजा ढाले यांनी बरखास्त केलेल्या दलित पँथरचे ' भारतीय दलित पँथर ' नावाने १९७७ सालात पुनरुज्जीवन करण्यात मस्के यांचा प्रा. अरुण कांबळे, गंगाधर गाडे, रामदास आठवले, प्रीतमकुमार शेगावकर, एस. एम. प्रधान, टी. एम. कांबळे यांच्यासोबत पुढाकार होता. दयानंद मस्के हे मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरचे रहिवासी आहेत.
No comments:
Post a Comment