रेल्वे परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना आखा - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

25 February 2025

demo-image

रेल्वे परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना आखा

 Rain%20water%20logging

मुंबई - जोरदार पावसाप्रसंगी उपनगरीय रेल्वे सेवा बाधित झाल्यास जनजीवन विस्कळीत होते. गतवर्षी चुनाभट्टी, भांडुप रेल्वेस्‍थानकात पाणी साचल्‍याने रेल्‍वे सेवा बाधित झाली. या वर्षी त्‍याची पुनरावृत्‍ती होता कामा नये. यासाठी रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी पावसाळ्यात संभाव्य आव्हानांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने उपाययोजना आखाव्‍यात. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे अधिका-यांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी. दीर्घकालीन कायमस्‍वरूपी तोडगा काढण्‍याबरोबरच विविध पर्यायांची चाचपणी करावी. रेल्‍वे परिसरातून वाहणा-या नाल्‍यांची, कलव्हर्टची स्वच्छता करावी. ही कामे विहित वेळेत पूर्ण करून पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल, अशा त-हेने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अलीकडे म्हणजे दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत रेल्वे प्रशासनातर्फे मध्‍य रेल्वे मार्गावरील चुनाभट्टी, भांडुप रेल्वे स्थानकांबाबत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या मुद्यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने अभिजीत बांगर यांनी आज (दिनांक २५ फेब्रुवारी २०२५) महानगरपालिका पर्जन्‍य जलवाहिन्‍या खाते, पूल खाते आणि रेल्वे विभागाच्‍या अधिका-यांची बैठक घेतली. त्‍यावेळी बांगर यांनी निर्देश दिले.

महाराष्‍ट्र नगर सब वे येथील लघु उदंचन केंद्रात ५ X ५ मीटर क्षमतेची साठवण टाकी (संप) आहे. या साठवण टाकीची क्षमता १५ X ६ मीटर करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी रेल्‍वेच्‍या जमिनीवर बांधकाम करावे लागणार आहे. रेल्‍वे विभागाशी समन्‍वय ठेवून निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण केली तर दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत जलद गतीने काम होईल, हे सुनिश्चित करावे, अशा सूचना विभागास देण्यात आल्या.

चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानकाबाबत पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाने असे प्रस्‍तावित केले की, हायवे सोसायटीकडून येणारे पावसाळी पाणी २ उच्‍च क्षमतेचे पंप लावून नाल्‍यामध्‍ये सोडण्‍यात यावे. जेणेकरून हे पाणी चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानक दिशेला जाणार नाही. मात्र, या उपाययोजनेमुळे पाणी वहनाची परिणामकारकता १०० टक्‍के राहील, याबाबत साशंकता असल्याने चुनाभट्टीकडे जाणारी पावसाळी जलवाहिनी ही महामार्ग ओलांडून झोपडपट्टी क्षेत्राबाहेर रेल्‍वे हद्दीतून बाहेर काढणे आणि पुढे ही जलवाहिनी पश्चिमेकडील अस्तित्वातील नाल्‍यास जोडावी, जेणेकरून अतिरिक्‍त पावसाळी पाणी मिठी नदीकडे वळविणे असा पर्याय सुचविण्यात आला. हा प्रस्‍ताव व्‍यवहार्य वाटल्‍यास त्‍याची त्‍वरित अंमलबजावणी करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.

उषा नगर (भांडूप) येथे पूल विभागामार्फत पूल / कल्‍वर्टचे काम सुरू आहे. त्‍या ठिकाणची समांतर जलवाहिनी स्‍थलांतरीत करून छोटा पूल पाडणे आत्‍यंतिक आवश्‍यक आहे, अन्‍यथा मागील वर्षाच्‍या पावसाप्रमाणे यंदादेखील पाणी साचण्‍याची दाट शक्‍यता आहे. दिनांक १५ मे २०२५ पर्यंत जलवाहिनी स्‍थलांतर केली जाईल तसेच जीर्ण पूल निष्‍कासन करण्‍याबाबत दक्षता घेतली जाईल, असे पूल विभागाच्‍या अधिका-यांनी नमूद केले. माटुंगा येथे रेल्‍वे विभागाकडून रूळाखालून पावसाळी जलवाहिनी विस्‍तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, त्‍याची लांबी ८०० मीटरपर्यंत वाढवावी जेणेकरून त्‍याची उपयुक्‍तता वाढेल, असा निर्णय बैठकीत घेण्‍यात आला.

बांगर म्‍हणाले की, पावसाळ्यास ३ महिन्‍यांची अवधी आहे. तत्‍पूर्वी, या कालावधीत रेल्‍वे विभाग आणि महानगरपालिका यांच्‍यात उच्‍च प्रतीचा समन्‍वय ठेऊन कमीतकमी कालावधीत कामे पूर्ण करावीत. जेणेकरून रेल्‍वे रूळांवर पाणी साचण्‍याच्‍या घटना टाळता येतील. उपनगरीय रेल्वेसेवा पावसाळ्यात बाधित होणार नाही, अशारितीने सर्व कामे चोखपणे पूर्ण करावीत. जोरदार पावसामुळे रेल्‍वे मार्गांवर पाणी तुंबणार नाही, यासाठी पाणी साचणा-या ठिकाणी उपसा पंप बसवावेत. जेणेकरून पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा तत्काळ निचरा करता येईल. रेल्वे अंतर्गत असलेल्या ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा उचलण्यात यावा; नियमितपणे नाले स्वच्छता करावी.

एम पूर्व विभागाच्या सहायक आयुक्‍त अलका ससाणे, प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या) श्रीधर चौधरी, प्रमुख अभियंता (पूल) उत्‍तम श्रोते यांच्‍यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages