'जंक्शन टू जंक्शन' पद्धतीने काँक्रिटीकरण कामे व्‍हावीत - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

28 February 2025

demo-image

'जंक्शन टू जंक्शन' पद्धतीने काँक्रिटीकरण कामे व्‍हावीत

bmcjpn

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने सक्षम पायाभूत सुविधा विकासावर भर दिला आहे. या अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरु आहेत. त्यामुळे रस्त्यांचे जाळे अधिक वाढणार असून प्रवास सुकर होणार आहे. मात्र, काँक्रिटीकरण कामे करताना 'जंक्शन टू जंक्शन' (एखाद्या चौकापासून दुसऱ्या चौकापर्यंतची जोडणी) या पद्धतीनेच झाली पाहिजेत. जर दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत काम होणार नसेल तर विनाकारण नवीन खोदकाम केले जाणार नाही, याची दक्षता घ्‍यावी. विहित कालावधीतच गुणवत्तेनुसार रस्ते कामे करावीत. विलंब कदापी खपवून घेणार नाही, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. रस्ते काम सुरु असताना बॅरेकेडिंग (रस्तारोधक) योग्य पद्धतीने करावी, जेणेकरून वाहतुकीसाठी अधिकाधिक रस्‍ता खुला राहू शकेल, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले. 

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्ते काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरू आहेत. या अंतर्गत पश्चिम उपनगरात टप्पा १ व २ असे मिळून १ हजार १७३ रस्त्यांचे (एकूण लांबी ४३३ किलोमीटर ) काँक्रिटीकरण काम सुरू आहे. त्यापैकी टप्पा १ मधील २६० तर टप्पा २ मधील ४९६ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी काल रात्री (दिनांक २८ फेब्रुवारी २०२५) प्रत्यक्ष भेट देऊन काँक्रिटीकरण कामाची पाहणी केली. त्यात मालाड पश्चिम येथील रामचंद्र मार्ग, एव्हरशाईन नगर मार्ग आणि अंधेरी येथील मॉडेल टाऊन मार्ग आदींचा समावेश आहे. 

कॉंक्रिटीकरण कामासाठी कंत्राटदारांनी काशिमीरा (मीरा भाईंदर), कुर्ला येथे ' रेडी मिक्स काँक्रिट प्लांट' उभारले आहेत. तेथून तयार माल (रेडी मिक्स काँक्रिट) प्रकल्‍पस्‍थळी आणला जातो. या मालाच्‍या गुणवत्‍ता तपासणीसाठी क्यूब टेस्ट, स्लम्प टेस्ट बार टेस्‍ट आदी तांत्रिक चाचण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच, 'रेडी मिक्स काँक्रिट प्लांट'च्‍या ठिकाणी उपस्थित गुणवत्ता व्यवस्थापन व संनियंत्रण संस्थेचे प्रतिनिधींसमवेत 'व्हिडिओ कॉल' द्वारे संवाद साधण्‍यात आला. प्रमाणित कार्यपद्धतीनुसार कामकाज केले जात आहे का, याची खातरजमा बांगर यांनी केली. तसेच, कॉंक्रिटीकरण कामातील विविध आव्हानांच्या अनुषंगाने यावेळी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी.) तसेच गुणवत्ता व्यवस्थापन व संनियंत्रण संस्थेचे प्रतिनिधींसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली.  

बांगर म्हणाले की, पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी म्‍हणजेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे अत्युच्च गुणवत्ता कायम राखून वेगाने पूर्ण करावीत. 'जंक्शन टू जंक्शन' या पद्धतीनेच रस्ते जोडणी केली पाहिजे. त्यासाठी नियोजित वेळापत्रक आणि उपलब्ध मनुष्यबळ, साहित्यसामुग्री यांची सांगड घातली पाहिजे. काँक्रिटीकरणाचे सुरु असलेले काम प्राधान्याने पूर्णत्वास न्यावे. विलंब, दिरंगाई होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी.

'रेडी मिक्स काँक्रिट प्लांट' ते प्रकल्‍पस्‍थळ दरम्‍यान वाहतुकीचे अंतर, तापमान यांचा विचार करून मालाचा दर्जा सुयोग्‍य रहावा, याची दक्षता घ्‍यावी, असे निर्देश देतानाच बांगर म्‍हणाले की, कार्यस्थळी नागरिकांसाठी प्रदर्शित केलेल्या माहितीफलकावर काम सुरु केल्याचा दिनांक, काम संपुष्टात येण्याचा दिनांक, कामाचा एकूण कालावधी, रस्त्याची लांबी, रुंदी आणि काम कोठून कोठेपर्यंत केले जाणार आहे आदींची माहिती अगदी ठळकपणे नमूद करावी. विशेषत: रस्ते काम सुरु असताना बॅरेकेडिंग (रस्तारोधक) योग्य पद्धतीने करावी, जेणेकरून नागरिकांना रस्त्याचा अधिकाधिक वापर वाहतुकीसाठी करता येईल.

प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (पश्चिम उपनगरे) संजय बोरसे, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) प्रा. सोलोमन, गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages