जे. जे. उड्डाणपूल खालील रस्‍ता दुभाजकाचे सुशोभीकरण करा - महापालिका आयुक्‍त - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2025

demo-image

जे. जे. उड्डाणपूल खालील रस्‍ता दुभाजकाचे सुशोभीकरण करा - महापालिका आयुक्‍त

WhatsApp%20Image%202024-03-20%20at%205.00.37%20PM

मुंबई - कुतुब - ए - कोंकण मकदूम अली माहिमी उड्डाणपूल (जे. जे. उड्डाणपूल) खालील संपूर्ण २.१ किलोमीटर लांबीच्‍या रस्‍ता दुभाजकाचे संकल्‍पना आधारित (थीम बेस्‍ड्) सुशोभीकरण करावे, ध्‍वनी प्रदूषणास प्रतिबंध ठरू शकणारी झाडे लावावीत, आकर्षक बागकामे (लॅण्‍डस्‍केपिंग) करावी, एकसमान रचनेचे मजबूत संरक्षक कठडे (रेलिंग) उभारावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍यावतीने 'मुंबई सुशोभीकरण प्रकल्‍प' हाती घेण्‍यात आला आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्‍या ए, बी आणि सी विभागातून जाणा-या कुतुब - ए - कोंकण मकदूम अली माहिमी उड्डाणपूल (जे. जे. उड्डाणपूल) खालील दुभाजकाचे सुशोभीकरण करण्‍यात येत आहे. या सुशोभीकरण कामाची प्रत्‍यक्ष पाहणी महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केली. त्‍यावेळी त्‍यांनी निर्देश दिले. सहायक आयुक्‍त (बी विभाग) शंकर भोसले यांच्‍यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्‍त गगराणी म्‍हणाले की, जे. जे. रूग्‍णालय जंक्‍शन ते महात्‍मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) हा वर्दळीचा मार्ग आहे. नागरिक, प्रवाशांच्‍या सोयीसाठी महानगरपालिकेने रस्‍ता दुभाजक बांधला आहे. संपूर्ण रस्‍ता दुभाजकाचे आकर्षक तसेच संकल्‍पना आधारित (थीम बेस्‍ड्) सुशोभीकरण करण्‍यात यावे. अंदाजे ३ मीटर रूंदीच्‍या दुभाजकाचे आकर्षक पद्धतीने बागकामे (लॅण्‍डस्‍केपिंग) करावीत. ध्‍वनी प्रदूषणास प्रतिबंध ठरू शकणारी झाडे लावावीत. एकसमान रचनेचे मजबूत संरक्षक कठडे (रेलिंग) उभारावेत. पर्यावरणपूरक सुशोभीकरण करावे. दुभाजकांचा दुरूपयोग होऊ नये, कठड्यांची मोडतोड, नासधूस होऊ नये यासाठी आवश्‍यक असल्‍यास सुरक्षा व्‍यवस्‍था करावी, सुशोभीकरण कामे तातडीने करावीत, आदी निर्देश गगराणी यांनी दिले.

सुशोभीकरण कामांतर्गत उड्डाणपुलाखालील ३ ठिकाणी 'बेस्‍ट'च्‍या कालबाह्य डबल डेकर बसगाड्यांमध्‍ये कलादालन (आर्ट गॅलरी), उपाहारगृह (कॅफे टेरिया), वाचनालय (लायब्ररी) अशा खास सुविधा मुंबईकरांना उपलब्‍ध करून देण्‍याची योजना राबविली आहे. मंजूर केलेल्‍या संकल्‍पनेनुसारच ते विकसित करावे. त्‍याचे संचलन स्‍वयंसेवी संस्‍था / महिला बचत गटामार्फत करावे, असे निर्देश देखील महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages