ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासुन आणि स्वातंत्र्यापासुन दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र दुर्लक्षित केले जात होते, त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. पुढे मात्र क्रांतिज्योती सावित्रीबाईना जोतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोण त्यांच्या ठायी असल्याने स्वत:चे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी त्यांना प्राप्त झाली, हे त्यांचे अहोभाग्य म्हणावे लागेल. ज्योतिबा सारखे व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनी आलं आणि आयुष्यच पार बदलून गेले.
सावित्रीबाईना बालपणी घरच्यांकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते, कारण त्यासाठी मनुवाद्यांचे वर्चस्व होणे, स्त्रीला शिक्षणापासुन मज्जाव होता. सावित्रीबाईना मात्र बालवयापासून शिकावे असे मनोमन वाटत होते. ते त्यांनी विवाह झाल्यानंतर साध्य केले, ही त्यांच्या जमेची बाजू झाली. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते. त्यांनी यशवंतरावांच्या मुलाला आणि त्यांच्या विधवा आईला आपल्या घरी आश्रय दिला. पुढे सावित्रीबाईनी ज्योतिबांशी विचार विनिमय करुन यशवंताला दत्तक घेतले. यशवंताच्या खऱ्या आईला सावित्रीबाईनी अत्यंत प्रेमाने वागविले, ही त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष होती. ज्या जोतिबांच्या मनाने स्त्रीयांनी शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्री शिक्षणाला आरंभ केला होता. जोतिबांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबत विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य, पण ज्योतिबांचा मुलीसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला होता. त्यामुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासून म्हणजे सावित्रीबाईपासुनच केला. शेतात काम करतानाच झाडाखाली बसून काळया मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या. यामध्ये थोडी प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेऊन पुढचे शिक्षण चालू ठेवले. त्यामुळे स्त्री शिक्षणाला चालना देण्याचे धैर्य त्यांनी दाखविले. त्या दरम्यान स्त्रीला शिक्षणापासुन वंचित ठेवता कामा नये.
असा निर्धार करुन 14 जानेवारी 1848 साली ज्योतिबांनी पुण्यातील बुधवारपेठेत भिडयांच्या वाडयात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका म्हणुन कार्यरत होत्या. सनातनी पुण्यात हलकल्लोळ माजवित होते. ‘कलीयुग आले, धर्म बुडाला, कली मातला’, अशी सनातन्यांनी बोंब करावयास सुरवात केली. त्याला न जुमानता बेडरपणे या सर्व गोष्टींना त्यांना काडीचीही किंमत दिली नाही. कारण त्यांना हे माहित होते की, चांगल्या कामाची उपेक्षा, अवहेलना होते नंतर त्याबद्दल कुतुहल निर्माण होते, व शेवटी त्याचा स्विकार होतो, तसे या कार्याचे झाले. पण मुलींना शिकवायचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना. तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या. सोबत त्यांची सहकारी फातिमा शेख यांनी सुध्दा त्यांच्या समवेत बरेच सहकार्य करुन त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या, तेही निरधास्तपणे. बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप असे त्याकाळी सर्वच समाज समजत असल्याने कसलीही तमा न बाळगता धाडसाने सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या.
पुण्यातील अतिकर्मठ ब्राम्हण लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल वगैरे फेकीत पण सावित्रीबाईनी या सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य अव्याहत चालू ठेवले. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर देान-तीन शाळा काढल्या अशावेळी शिक्षकांची गरज भासू लागली स्त्री शिक्षिका मिळणे कठिणच होते. अशावेळी उस्मान शेख यांच्या भगिनी फातीमा शेख यांनी सावित्रीबाई समवेत शिक्षिका म्हणुन उत्तम कार्य केले. उस्मान शेख हे ज्योतिबांचे जीवलग मित्र होते. हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते. पुणे येथील हे शैक्षणिक कार्य पाहून 1852 मध्ये इंग्रज सरकारने फुले पती-पत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केले. भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांची ही सेवाभावी कृती प्रत्येक स्त्रीने आत्मसात करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे आणि ते पूर्णत्वास नेणे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे.
पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या. तर त्या कार्यावर त्यांची अगाध निष्ठा होती. म्हणून पती निधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे समता आंदोलन पुढे चालू ठेवले. सावित्रीबाईंनी तेव्हा त्यांच्या ठायी असणाऱ्या कविमनाला रुचलेल्या कविता आणि अभंग शब्दबध्दही केले. 1854 साली त्यांचा हा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला, त्यात त्यांनी आपल्या कवितांमधुन स्त्री, शुद्र, अतिशुद्रासाठी शिक्षणासाठी मोल, महत्व तत्ववेत्याला शोभेल अशा शब्दामधुन साध्या आणि सोप्या पध्दतीने सांगीतले आहे. ‘शुद्राचे दुखणे’ या काव्यातून मनुष्यत्वासाठी शिक्षणाचे महत्व दिले आहे. ते अधोरेखित करण्याची गरज आहे.
“दोन हजार वर्षाचे शुद्राचे दुखणे लागले
ब्राम्हविहित सेवेचे-भूदेवांनी पछाडले
अवस्था पाहुनी त्यांची हाच शब्द मनी उठे
सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुध्दीही आटे
खाली शुद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाटते पहा”
समाजातल्या दीन-दलितांना मायेने जवळ करणाऱ्या स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणुन धडपडणाऱ्या सावित्रीबाई खऱ्या अर्थाने सहचारिणी म्हणुन शोभल्या. त्यांनी आपल्या पतीच्या महान कार्याचा गौरव काव्यबध्द केला. त्यात कृतज्ञभाव आणि पती ज्योतिबा बद्दल आदर व्यक्त करण्यात आला. काव्य लेखना प्रमाणेच त्यांनी गृहीणी या मासीकात लेखही लिहीलेत त्यांच्या लिखानांना अनुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखनही परिणाम कारक ठरले.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला होता. दोघांनी शिकावे समाजातील अस्पृश्यास्पृश्यता नष्ट व्हावी, अनाथांना आश्रय मिळावा ही त्यांची कार्यक्षेत्रे त्यांच्या श्रध्देने प्रभावी झाली. सामाजिक कार्यात पुढाकार घेणे, हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच 1876-77 मधल्या दुष्काळात प्लेगची भयंकर साथ आली असतांना त्यांनी आपल्या स्वत:च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यासाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वत:च प्लेगच्या भीषण रोगाने पछाडल्या आणि अशातच त्यांचे निंधन झाले.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या, त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. 10 मार्च 1998 रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण ‘सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ’ असे करण्यात आले.
त्यांच्या थोर सामाजिक कार्याविषयीची कृतज्ञता म्हणून राज्य शासनाने 3 जानेवारी 1995 पासून सावित्रीबाईचा जन्मदिन हा संपूर्ण महाराष्ट्रात ‘बालिका दिन’ व ‘महिला मुक्तीदिन’ म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची क्रांतीज्योत सतत तेवत ठेवणे हे आपले आद्य: कर्तव्य आहे. त्यांच्या 193 व्या वाढदिवसानिमीत्त विनम्र अभिवादन !
प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 09923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com
No comments:
Post a Comment