ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या-त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता. 13 जुन 1817 रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिश अधिनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले. अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न खडकीची लढाई केला परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई 5 नोव्हेंबर 1817 रोजी झाली होती. त्यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली होते. आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली. दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होताच, ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले. डिसेंबर 1817च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भिमा या गावात झाली.
पेशवा दुसरा बाजीराव नासिककडे न जाता ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून 30 डिसेंबर रोजी चाकण येथे येऊन पोहचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गाठावे किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे असा बाजीरावाचा बेत असल्याचे स्मिथ यास दिसून आले, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. त्याने आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ. स्टॉंटन थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. 31 डिसेंबर 1817 रोजी रात्री 8 वाजता शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली. स्टॉंटनची बातमी बापू गोखल्यास होतीच. घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गाठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतानी आज्ञा केली, की आज लढाई करून आम्हास पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा. गावास लहानशी तटबंदी होती तेथे इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यावर दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरू केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील अरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. दोन्ही बाजूंचे भरपूर नुकसान झाले. रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून मराठ्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. सकाळी इंग्रजांच्या सैनिकांनी पाहिले तर मराठा सैन्य निघून गेल्याचे दिसले. इंग्रजांचे 275 मारले गेले तर 175 जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे 500-600 लोक पडले. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून जनरल स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की, 2 जानेवारी 1818 रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोचला. त्याच दिवशी कॅ. स्टॉंटन हा जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला.
कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने 25000 सैनिक होते, ज्यातील 20000 घोडदळ, 5000 पायदळ सतत तैनात असत. कंपनी सरकारच्या सैन्यांनी हल्ला करु नये यासाठी प्रत्येकी 600 सैनिकांच्या तीन तुकडया असत. ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना, अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले, जे पुण्यातील ब्रिटीश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते. पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे 2000 सैनिक पाठवले.
कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ 12 तास लढाई केली. मोठ्या ब्रिटीश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली. ही लढाई इंग्रज-मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाचा भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना, अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले.
1800 च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते, त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती. कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी पेरणे फाटया जवळ पूणे-अहमदनगर रोड वर 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या 49 सैनिकांची नावे कोरली. यामध्ये 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे - ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.
हेन्री टी प्रिंसेप यांनी लिहिलेल्या ‘हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया’ पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात आहे. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते. आजच्या दिनी अशा शूर सैनिकांना मानवंदना..
No comments:
Post a Comment