कोरेगाव भीमा, शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2025

कोरेगाव भीमा, शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन





पुणे - कोरेगाव भीमाला 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. यासाठी विजयस्तंभाला आकर्षक अशी सजावट केली असून लाखो अनुयायी अभिवादनासाठी येत आहे. विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील कोरेगाव भीमा येथे दर्शन घेतले आहे.

कोरेगाव भीमा येथे मागील दोन दिवसांपासून अनुयायी मोठ्या संख्येने येत आहेत. राज्य सरकारकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच येणाऱ्या अनुयायी कोणत्याही व्यत्यय येऊ नये आणि प्रत्येकाला अभिवादन करता यावे यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. नेतेमंडळी देखील अभिवादनासाठी येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील शौर्यस्तंभाला अभिवादन केले आहे. यावेळी उपस्थितांसोबत त्यांनी संवाद साधला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रकाश आंबेडकर शौर्यदिनाबाबत म्हणाले की, माझ्या प्रिय बांधवांनो, भीमा-कोरेगाव शौर्य दिवस हा आपल्या पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे. 500 (499 महार आणि 1 मातंग) सैनिक आणि अलुतेदार सैन्याने त्यांच्या ब्राह्मणवादी पेशव्यांच्या शासकांवर केलेल्या विजयापासून प्रेरणा घ्या. त्यांच्या पराक्रमाची सकारात्मक आठवण ठेवा आणि बाबासाहेबांना जे हवे होते तेच स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षेचे प्रतीक म्हणून त्याचा वापर करा. आज आणि नजीकच्या काळात तुम्ही विजयस्तंभाला भेट द्याल तेव्हा सैनिकांचा सन्मान करा आणि बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या – एक स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय शक्ती त्यातूनच उभी राहू शकते. जय भीम, अशा भावना प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील कोरेगाव भीमा येथे अभिवादन केले आहे. रामदास आठवले यांनी सर्व सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करुन विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून समाजातील सर्वांना आवाहन केले.

प्रशासन आणि पोलिसांची जय्यत तयारी - 
कोरेगाव भीमा पोलीसांचा चोख बंदोबस्त असून अनुयायींच्या सोयींसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तामध्ये पाच हजार पोलीस कर्मचारी, 750 पोलिस आधिकारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करत आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 पोलिस टॉवर, 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस पथक आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी शांतता राखण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी सोशल मीडियावरही निर्बंध घालण्यात आले आहे. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी जाहीर केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad