मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम सुरू आहे. महानगरपालिकेच्या (BMC) या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पांतर्गत, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत ४.७ किमी लांबीचा दुहेरी बोगदा बांधण्यात येणार आहे. या बोगद्याद्वारे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ 75 मिनिटांवरून 20 ते 25 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. (Goregaon Mulund link road Project)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये जीएमएलआरच्या तिसऱ्या टप्प्यातील दुहेरी बोगद्याच्या कामाचे उद्घाटन केले होते. आता या दुहेरी बोगद्यांच्या कामाला गती देण्यासाठी बीएमसीने थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑडिटच्या कामासाठी व्हीजेटीआयची नियुक्ती करण्यात आल्याचे बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडने मुलुंड, ठाणे येथे जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो. मात्र गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांचा प्रवास शक्य होणार आहे. सध्या तरी या रस्त्यावर साधारण दीड तास लागत असून संपूर्ण प्रवास हा वाहतूक कोंडीमुळे कंटाळवाणा होत आहे. मात्र आता गोरेगाववरून मुलुंडला जाणे अधिक सोपे होणार आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी बांधण्यात येत असलेल्या दुहेरी बोगद्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत दुहेरी बोगदा बांधणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यामुळेच कामाचा दर्जा आणि प्रकाश व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी तसेच तांत्रिक मदतीसाठी व्हीजेटीआयची मदत घेतली जात आहे. तसेच कोस्टल रोडच्या बांधकामात सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन दुहेरी बोगद्याच्या बांधकामात थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बोगदा खोदण्यासाठी चीनमधून टनेल बोअरिंग मशीन मुंबईत आणण्यात येणार आहे. मार्च 2025 पूर्वी मशीन येईल आणि त्यानंतर बोगद्याचे काम सुरू होईल. दुहेरी बोगद्याच्या बांधकामादरम्यान गुणवत्तेच्या दृष्टीने थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल, परंतु त्यामुळे खर्च वाढेल. सध्या ट्विन टनेलची किंमत 6300 कोटी रुपये आहे, मात्र थर्ड पार्टी ऑडिटनंतर हा खर्च 6500 कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत या दुहेरी बोगद्याच्या बांधकामासोबतच फिल्मसिटीजवळ १.६ किमी लांबीचा बोगदाही बांधण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment