मुंबई - रेल्वे पोलिसांच्या गणवेशाचा आता लूक बदलणार असून, नवीन वर्षात रेल्वे पोलिस अधिकारी व अंमलदारांचे गणवेश हे ‘अप-टू-डेट’ असावेत यासाठी विशेष निर्णय घेतला आहे. यापुढे गणवेश परिधान करताना पूर्वीसारखा गणवेश सोडून त्यांच्या शरीरयष्टीला शोभेल असा आणि फॅशनविरहित गणवेश असावा अशा सूचना दिल्या आहेत. पूर्वी वारंवार केल्या जाणाऱ्या चुका सुधारण्याबाबत पोलिसांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे गणवेश घालताना पोलिसांकडून होणारी मनमानी आता थांबणार आहे. यासाठी खास नियमावली तयार करण्यात आली आहे.
याबाबत रेल्वे पोलीस दलाने खास आदेश काढून यापुढे गणवेश कसा असावा याबाबतची मार्गदर्शक तत्वे सूचित केली आहेत. तर दुसरीकडे नियमांत काळानुरूप पोलीस महासंचालक कार्यालयाने काही बदल करून वेळोवेळी परिपत्रके निर्गमित केलेली आहेत. साधारणपणे अतिशय सैल अथवा अतिशय घट्ट गणवेश परिधान करू नये, असे सूचित केले आहे. या सूचना अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता नवीन वर्षांत हा गणवेश बदल करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिस दलातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी येत्या जानेवारी २०२५ पासून सर्वोत्तम गणवेश परिधान करण्याचा संकल्प करणार आहेत. त्यानुसार पोलीस अंमलदार म्हणजेच पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उप-निरीक्षक यांनी आपल्या गणवेशबाबत नियम पाळणे आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यांनी खाकी रंगाचा शर्ट व पँट स्वतःच्या शरीरयष्टीला शोभेल असा व्यवस्थित शिवलेला असावा, अतिशय सैल अथवा अतिशय घट्ट गणवेष परिधान करू नये असे सूचित केले आहे.
लॅनयार्ड व शिट्टी -
लॅनयार्ड दोरीचा पिळ पुढील बाजूस करून डाव्या खांद्याच्या बाहीत व प्लॅपमध्ये व्यवस्थित अडकवून शिट्टी डाव्या खिशात उजव्या बाजूला अर्धी गाठ आत व अर्धी बाहेर या पध्दतीने अडकवावी. लॅनयार्ड दोरी ही पिवळ्या रंगाची व स्वच्छ घालावी. मळकट लॅनयार्ड घालू नये. तर फित आणि बेंज (मोनोग्राम) हा प्रत्येक अंमलदाराने आपल्या हुद्याप्रमाणे फित पट्टी व मपो बेंज प्लॅपमध्ये व्यवस्थित लावावा.
No comments:
Post a Comment