नागपूर - २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. यातच अनेक मुद्यांवरून विरोधक महाविकास आघाडीने महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. यामध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, अलीकडेच शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचे सलग कौतुक केले. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
जिव्हाळा संस्थेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना अगदी दिलखुलास पद्धतीने उत्तरे दिली. शरद पवार सातत्याने संघाचे कौतुक करत असून, भाजप व शरद पवारांची जवळीक वाढत आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. यावर बोलताना, तुम्ही २०१९ नंतर माझी विधाने पाहिली असतील तर काही गोष्टी लक्षात येतील. काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की, कुठलीही गोष्ट होणारच नाही असे समजून चालत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. तसे काही झालेच पाहिजे असे नाही. मात्र उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, मग राजकारणात काहीही होऊ शकते. असे व्हावे असे नाही. परंतु ते होणे फार चांगले आहे असे मला वाटत नाही. ते व्हावे या मताचा मी नाही. मात्र राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, खूप ठामपणे असे होणारच नाही, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा भरवसा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले.
शरद पवार अतिशय चाणाक्ष नेते -
शरद पवार हे अतिशय चाणाक्ष नेते आहेत. त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल की, त्यांनी लोकसभेच्या वेळी एवढे मोठे वायू मंडळ तयार केले होते. परंतु, ते एका मिनिटात पंक्चर कसे काय झाले? ते वायूमंडळ पंक्चर करणारी शक्ती कोण आहे? त्यांच्या लक्षात आले की, ही शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाही. तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. शेवटी कधीतरी प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करावे लागते, त्या हिशोबाने त्यांनी संघाचे कौतुक केले असेल, असे मला वाटते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दोन्ही नेते विश्वासू -
मनापासून विश्वास टाकावा असा अधिक विश्वासू सहकारी कोण, एकनाथ शिंदे की अजित पवार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही माझ्यापुरते विचाराल तर या दोन्ही नेत्यांशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्या दोघांचे वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे डायनॅमिक्स असू शकतात. एकनाथ शिंदे आणि माझी जुनी मैत्री आहे. परंतु, अजित पवार यांच्याकडे जी राजकीय परिपक्वता आहे त्यामुळे त्यांची आणि माझी व्हेवलेंथ जुळते, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment