मुंबई - पवई येथे जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला मोठी गळती लागल्याचे आज (दिनांक २१ जानेवारी २०२५) पहाटे आढळून आले. त्यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.
दुरुस्ती कार्यवाहीसाठी पवई ते धारावी दरम्यानची जलवाहिनी बंद करण्यात आली आहे. या दुरुस्ती कामकाजाकरीता २४ तासांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्तर विभाग आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
आज (दिनांक २१ जानेवारी २०२५) पहाटेच्या सुमारास १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीत पवई व्हेंचरजवळ जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ (जेव्हीएलआर) मोठ्या प्रमाणात गळती आढळून आली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी झडपा (व्हॉल्व्ह) तातडीने बंद करण्यात आल्या. गळती रोखून दुरुस्ती करण्याचे काम जल अभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
दुरूस्ती अंतर्गत मुख्य जलवाहिन्यांचे पृथक्करण पवई ते मरोशीपर्यंत घेण्यात येणार आहे. या पृथक्करण कार्यवाहीमुळे के पूर्व विभाग, एस विभाग, एच पूर्व विभाग आणि जी उत्तर विभागातील पाणीपुरवठा बाधित होणार आहे. जलवाहिनी दुरूस्ती कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
बाधित होणारे परिसर
एस विभाग - गौतमनगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रस्ता, मिलिंद नगर, एल ऍण्ड टी परिसर
के पूर्व विभाग - ओम नगर, साहारगाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स रूग्णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामणवाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर
जी उत्तर - धारावी
एच पूर्व - बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस
No comments:
Post a Comment