नवी दिल्ली - राज्यात महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर शिवसेना आणि भाजप युती आधिक मजबूत बनली आहे. त्यातच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी युती धर्माचे पालन करत शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या पाठिंब्याचे पत्र आज शिवसेना दिल्ली प्रदेश राज्य प्रमुख संदीप चौधरी यांनी भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांना दिले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपच्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. राज्यात शिवसेना भाजप युती तिसऱ्यांदा सत्तेत आली. हिंदुत्वाचा विचार घेऊन मागील तीन दशके शिवसेना आणि भाजप युती सक्रिय आहे. राष्ट्रीय राजकारणातील शिवसेना भाजप युती ही सर्वात जुनी युती म्हणून ओळखली जाते.
दिल्ली देशाची राजधानी आहे. दिल्लीला सर्वच दृष्टीने महत्त्व आहे. या राज्यात सुशासन आणि भ्रष्टाचार मुक्त राज्य सरकार आवश्यक आहे. ‘एनडीए’मधील विश्वासू घटक पक्ष या नात्याने शिवसेना भाजपला पाठिंबा देत असल्याचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारप्रमाणे दिल्लीत एक सशक्त आणि मजबूत सरकार आवश्यक त्यासाठी दिल्लीत भाजपचे सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मागील दहा वर्षात भारताचा जगभरात डंका वाजला. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली. ‘विकसित भारत विकसित दिल्ली’ या उद्देशाला साध्य करण्यासाठी भाजप दिल्लीत सरकार स्थापन करेल, असा विश्वास यावेळी संदीप चौधरी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे शिवसेनेच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.
काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या सरकारने मागील 30 वर्षात दिल्लीची लूट केली. विविध घोटाळ्यांमुळे दिल्लीची प्रतिमा मलिन झाली. त्यातही मागील दहा वर्षात मद्य घोटाळा, दिल्ली जल बोर्ड घोटाळा अशा हजारो कोटींच्या घोटाळ्यांतून आम आदमी पक्षाने दिल्लीची लूट केली. मुख्यमंत्री निवासावर शेकडो कोटींची उधळपट्टी झाली. यमुना नदी आणि दिल्लीचे प्रदूषण कमी करण्यास आम आदमी सरकार सपशेल अपयशी ठरले. दिल्लीला आता डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश प्रमाणे प्रगती करण्यासाठी दिल्लीत भाजप सरकार आवश्यक आहे. दिल्लीकर जनता या घोटाळेबाजांना कायमचे घरी बसवेल, असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला. दिल्लीकरांचे हित आणि विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment