जुलै नंतर निवृत्त होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पी. एफ. रक्कम मिळणार नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 January 2025

जुलै नंतर निवृत्त होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पी. एफ. रक्कम मिळणार नाही


मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली ११००कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी. एफ.ट्रस्टमध्ये भरली नसून ट्रस्टकडे गुंतवणुकी व्यतिरिक्त निधी फक्त जुलै पर्यंत पुरेल एवढाच शिल्लक आहे. लागलीच ही रक्कम ट्रस्टकडे भरली नाही तर जुलै नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पी. एफ. रक्कम मिळणार की नाही, अशी शंका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८९ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे ११०० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्र्याजुटीची अंदाजे १०००कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे २१०० कोटी  रुपयांची रक्कम गेले दहा महिने एसटीने  दोन्ही ट्रस्टकडे  भरणा केलेली नाही. पीएफ ट्रस्ट मधून कर्मचारी आपल्या खात्यावरील जमा रक्कमेतून आर्थिक अडचणीच्या वेळी ऍडव्हांस रक्कम घेत असतात पण गेले दहा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटीने पीएफ रक्कम ट्रस्टकडे जमा केली नाही. त्या मुळे ऑक्टोंबर २४ पासून एकाही कर्मचाऱ्याला पी एफ अँडव्हान्स रक्कम मिळालेली नाही. सद्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटीला सवलत मूल्य परतावा रक्कम देत असून दर महिन्याला सुमारे ३६० कोटी रुपये इतकी रक्कम होत असताना शासनाकडून फक्त ३०० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे. परिणामी कर्मचारी व अधिकारी यांना नक्त वेतन दिले जात असून त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या पीएफ, ग्र्याजुटी, बँक कर्ज, एलआयसी या रक्कमा त्या त्या संस्थांना भरल्या जात नाहीत. एसटीला कर्मचारी व अधिकारी यांच्या वेतनासाठी अंदाजे ४०० कोटी रुपये इतकी रक्कम दर महिन्याला लागत असून सरकार कडून सवलत मूल्य परतावा रक्कम फक्त ३०० कोटी रुपये इतकी येत आहे.कर्मचारी व अधिकारी यांची साधारण ३००० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणी थकली असून सरकारने एसटीला मागणी करण्यात आलेला पूर्ण निधी उपलब्ध करून दिला नाही तर जुलै नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम मिळणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्याचे अर्थमंत्री व उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या २७ तारखेला सर्व सरकारशी संबंधित विविध विभागांना लागणाऱ्या निधीचा आढावा घेण्यासाठी व नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केली आल्याचे सांगण्यात येत असून सदर बैठकीत एसटीला थकीत असलेल्या सर्व रक्कमा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad