मुंबई - दिनांक १ एप्रिल २०२४ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२४ या नऊमाहीत एकूण ५ हजार ८४७ कोटी ६८ लाख रुपये इतक्या रकमेच्या मालमत्ताकराचे संकलन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी एका दिवसात १७३ कोटी लाख ५९ लाख रूपये तर मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी २६० कोटी २८ लाख रूपयांचा कर भरणा मालमत्ताधारकांनी केला आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या नेतृत्वाखाली करनिर्धारण आणि संकलन खाते कार्यरत आहे. कर संकलाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
गत आर्थिक वर्ष (२०२३-२४) मधील मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ही दिनांक २५ मे २०२४ पर्यंत होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील सुमारे १ हजार ६६० कोटी रुपये रक्कम देखील यात समाविष्ट आहे. याचाच अर्थ विद्यमान आर्थिक वर्षाचे (२०२४-२५) कर संकलन हे ४ हजार १८७ कोटी १९ लाख रुपये इतके झाले आहे. विद्यमान आर्थिक वर्षाचे (२०२४-२५) मालमत्ता कर संकलन उद्दिष्ट्य हे सुमारे ६ हजार २०० कोटी रुपये इतके आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ६८ टक्के कर संकलन झाले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत कर भरणा करता यावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी शनिवारी देखील प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आली होती. तसेच यासंबंधीत अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अविरत कार्यरत आहेत.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी अंतिम देय दिनांक ३१ डिसेंबर २०२४ हा होता. कर भरणा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रे रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून तर रात्री १० वाजेपर्यंत या कालावधीत १७३ कोटी ५९ लाख रूपये आणि मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या वेळेत २६० कोटी २८ लाख रूपयांचा मालमत्ता कर नागरिकांनी भरला.
विक्रमी कर वसूल -
१) दिनांक १ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या एकाच महिन्यात २ हजार ५०१ कोटी ०७ लाख रूपयांचा विक्रमी कर वसूल
२) दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत शहर विभागात १ हजार ७७४ कोटी ४३ लाख रूपयांचा कर जमा
३) दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत पूर्व उपनगरे विभागात १ हजार ०९१ कोटी १० लाख रूपयांचे कर संकलन
४) दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत पश्चिम उपनगरे विभागात २ हजार ९७९ कोटी ४५ लाख रूपयांचे कर संकलन
No comments:
Post a Comment