मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेपैकी जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्याने फ़िल्टर न करता पाण्याचा पुरवठा होत असल्याचे संदेश समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. हे संदेश खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे. या अफवांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईकरांना दररोज ४००० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करताना, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि IS १०५००-२०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसारच जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. एकूणच, मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत पांजरापूर (१३६५ दशलक्ष लीटर प्रतिदिन), भांडुप संकुल (२८१० दशलक्ष लीटर प्रतिदिन), विहार (१०० दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि तुळशी (१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) येथे पाणी शुद्धीकरणाकरिता आणले जाते. या पाण्यावर पॉली एल्युमिनियम क्लोराईड (पीएसी), रॅपिड सँड फिल्टर्स, निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर आदी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, शुद्ध पाणी मुंबईकरांना पुरवले जाते.
मुंबईकरांना दररोज शुद्ध, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे समाज माध्यमांवरील खोट्या, दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment