मुंबई - मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडून करदात्या मुंबईकरांचा पैसा वाटेल तसा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे पैसेच नसल्याने मुंबई बकाल होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 25 वर्षात जी वेळ आली नाही ती वेळ आज पालिकेवर आली आहे. त्यामुळे मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेने वेळीच सावध व्हावे असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद केला आहे. या पुरवठादारांना गेल्या 3 वर्षात 160 कोटींची बिलांची थकबाकी देण्यात आलेली नाही. आधी 160 कोटी द्या त्यानंतरच आम्ही औषध पुरवठा पुन्हा सुरू करू अशी भूमिका ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने घेतली आहे. मुंबईकरांना रुग्णालयात औषधे मिळणे बंद झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबई महापालिकेत गेले 3 वर्षे कोणीही सत्तेत नाही. सर्व कारभार प्रशासक आणि पालिका प्रशासनाकडून चालवला जात आहे. पालिकेकडे पैसे नसल्याने औषध पुरवठादारांना पैसे देण्यास ऑडिट विभागाने नकार दिला आहे. गेल्या 3 वर्षातचपालिकेच्या तिजोरीत असलेले पैसे वाटेल तसे खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेचा कारभार कसा चालवायचा असा प्रश्न आयुक्तांना पडला आहे. मुंबईतील रस्ते धुण्यासाठी 4 हजार कोटींचे खर्च करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतल्याने आयुक्तांनी खर्च कमी केला आहे. महायुती आणि पालिका प्रशासनाच्या काळात मुंबई बकाल होण्याच्या मार्गावर लागली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, मुंबई महापालिकेत 25 वर्षे आमची सत्ता होती. या काळात आम्ही काय केले असा प्रश्न विचारला जात आहे. आमच्या कार्यकाळात पालिकेची अशी आर्थिक परिस्थिती झाली नव्हती. आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या लोकांनीच पालिकेवर ही वेळ आणली आहे. आज लाडक्या बहिणींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना औषध पुरवठा बंद झाला आहे. त्यांना औषधे मिळत नाहीत. अशी परिस्थिती महायुती सरकारने आणली आहे. महाराष्ट्र कुठे चाललाय हे मुंबईकर आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी पहावे.
No comments:
Post a Comment