मुंबई - राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे तातडीने दरे गावाला रवाना झाले आहेत. चार दिवासांसाठी एकनाथ शिंदे दरे गाव दौऱ्यावर गेले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे राजकारणात नवा भूकंप घडू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दावोसला शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत, अशी माहिती असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. हे भविष्यात सगळे पक्ष फोडतील, शिंदे गट देखील फोडतील, अजित पवार गट देखील फोडतील, असं धक्कादायक विधान संजय राऊतांनी केलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी दावोसला पोहचल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहिली. संजय राऊतांनी केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. हा राजकीय बालिशपणा आहे. एकनाथ शिंदेंनी जो राजकीय उठाव केला, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यामुळे मला दोनदा राज्याचं उद्योगमंत्रिपद मिळालं, याची मला जाणीव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसारख्या मोठ्या नेत्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते मी कधीही विसरु शकणार आहे. माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध राजकारणा पलीकडचे आहेत. त्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
विजय वडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबियातून मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातील मोठे झालेले आहात. त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र आपण ठेवू नका, कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटला? त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळे मी कधीही वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही. माझ्यासोबत सुरू असलेल्या या सगळ्या षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमचे नेते एकनाथ शिंदे यांचे माझ्यासोबत कोणतेही गैरसमज नाहीत, असं उदय सामंत म्हणाले.
No comments:
Post a Comment