मुंबई - मेसर्स वालेचा आरई इन्फ्रा (जेव्ही) या कंत्राटदाराला कुर्ला उन्नत मार्ग प्रकल्पाचे काम देण्यात आले असून, त्यात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई झाली आहे. सुरुवातीला प्रकल्प 3 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र विविध अडचणींमुळे अंतिम कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. अशी माहिती मध्य रेल्वेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वेकडे कुर्ला उन्नत मार्गाबाबत विविध माहिती विचारली होती. मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता रोहित मेहता यांनी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कळविले आहे की कुर्ला उन्नत मार्गाचे काम कंत्राटदार मेसर्स वालेचा आरई इन्फ्रा (जेव्ही) यांस दिले आहे. कार्य आदेश दिनांक 14 जानेवारी 2016 असून सद्यस्थितीत प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2025 आहे. एकूण करार मूल्य ₹89,26,24,027.13/- इतके असून आजपावेतो कंत्राटदाराला ₹62,65,44,808.95/- इतकी रक्कम देण्यात आली आहे.
कुर्ला उन्नत मार्गात एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म (3 COP सह) आहे. बुकिंग ऑफिस आणि इतर सुविधांसह मेझानाईन मजला आहे. सर्व FOB (फूट ओव्हर ब्रिज) आणि नवीन स्टेशन इमारतीला जोडणारा स्कायवॉक आहे. नवीन स्टेशन इमारत असून एस्केलेटर, लिफ्ट, इत्यादीचा समावेश आहे. कुर्ला उन्नत मार्गात दिरंगाईचे कारण सांगताना मध्य रेल्वेने साइटवरील विविध अडचणी असल्याचा दावा केला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने विलंबासाठी कोणताही दंड आकारलेला नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाव्यवस्थापक यांस लिहिलेल्या पत्रात प्रकल्पातील दिरंगाई आणि कंत्राटदारावर दंड न आकारल्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक सुविधांच्या उशिरामुळे प्रवाशांना होणारा त्रास वाढत आहे. वेळेवर प्रकल्प पूर्ण न झाल्यास खर्च वाढण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने योग्य प्रकारे प्रकल्पाची देखरेख करणे आणि दिरंगाईस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. असे सांगत गलगली म्हणाले की कुर्ला उन्नत मार्ग हा प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, दिरंगाई आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. या प्रकल्पाची गती वाढवून तो वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment