मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणा-या यंत्रणेतील महत्वाचा भाग असलेल्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित पिसे जल उदंचन केंद्र, विद्युत उपकेंद्र तसेच पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र (ता. भिवंडी, जिल्हा ठाणे) येथे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (दिनांक २ जानेवारी २०२५) भेट दिली. दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत अधिकारी, कामगार, कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
पिसे व पांजरापूर येथील विद्युत उपकेंद्र, बंधारा, शुद्धीकरण प्रकल्प, पाणी गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा आदींना भेट देत गगराणी यांनी कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, उपप्रमुख जल अभियंता (पिसे - पांजरापूर संकुल) राजेंद्र वावेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबईकरांना अखंड, अविरत आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणा-या अधिकारी, कामगार, कर्मचा-यांचे महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी कौतुक केले.
पिसे येथील १०० केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. अभियंते, कामगार, कर्मचाऱयांनी अहोरात्र प्रयत्न करत विद्युत उपकेंद्राची आव्हानात्मक दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला. ही कामगिरी बजावलेल्या जल अभियंता खात्यातील कामगार, कर्मचाऱयांचे व अधिकाऱयांचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी कौतुक केले. हे तातडीचे व जोखमीचे कामकाज सर्व आव्हानांवर मात करून पार पाडले. परिणामी, अत्यल्प पाणी कपात होऊन मुंबईकरांना अखंड व शुद्ध पाणीपुरवठा झाल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. महानगरपालिका आयुक्तांच्या आस्थेवाईक संवादामुळे कामगार, कर्मचारी भारावून गेले.
No comments:
Post a Comment