मुंबई - चीनमध्ये थैमान माजवणा-या एचएमपीव्ही व्हायरसचे नागपुरमध्ये दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर चोवीस तास उलटत नाहीत तोच मुंबईतही एका सहा महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका सहा महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची बाधा झाली होती. तिच्यावर मुंबईच्या हीरानंदानी रुग्णालयात उपचार करण्यात आले. १ जानेवारीपासून ती रुग्णालयात दाखल होती. उपचारानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ६ महिन्याच्या मुलीने व्हायरसवर मात केली आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने सांगितले आहे की या प्रकरणांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. बंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन, तर अहमदाबादमध्ये एक रुग्ण नोंदवला गेला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले आहे की एचएमपीव्हीविषयी घाबरण्याची गरज नाही. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की हा विषाणू नवीन नाही; तो यापूर्वीही दिसून आला आहे आणि सध्या तो पुन्हा सक्रिय झाला आहे. लवकरच योग्य ती नियमावली जाहीर केली जाईल. तसेच केंद्र सरकारने राज्यांना यासंदर्भात माहिती पुरविण्याचा निर्णय घेतला असून माध्यमांनी अधिकृत माहितीच प्रसारित करावी, असेही त्यांनी सुचवले.
चीनमध्ये थैमान घालणा-या या व्हायरसचे रुग्ण आता भारतातील कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातही आढळले आहेत. नागपूरमध्ये दोन मुलांना या व्हायरसची बाधा झाली असून, देशात आतापर्यंत एकूण सात रुग्ण आढळले आहेत. मात्र, मुंबईतील रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment