पुणे / मुंबई - पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome Pune) या आजाराने चिंता वाढवली आहे. गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या शंभरच्या पार गेली आहे. आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर पोहचली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक ही आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गुलेन बॅरी सिंड्रोमचा हा राज्यातला पहिला मृत्यू आहे. दरम्यान 'महात्मा फुले जनआरोग्य योजने' अंतर्गत या आजाराच्या उपचारासाठी असलेल्या दरांच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात एकाच दिवसांत 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25 हजार 578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत. सध्या 16 गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 'महात्मा फुले जनआरोग्य योजने' अंतर्गत या आजाराच्या उपचारासाठी असलेल्या दरांच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना असलेल्या खासगी रुग्णालयांना योजनेकडून 80 हजार रुपये दिले जात होते. ती आता दुप्पट करत एक लाख 60 हजार करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना असलेल्या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. 24) हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment