5 वर्षात बेस्ट बसचे 834 अपघात, 88 नागरिकांचा मृत्यु, 42.40 कोटींची भरपाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2025

5 वर्षात बेस्ट बसचे 834 अपघात, 88 नागरिकांचा मृत्यु, 42.40 कोटींची भरपाई


मुंबई - मागील 5 वर्षात 834 बेस्टचे बसअपघात घडल्याची माहिती देत 88 जीवितहानी झाल्याची कबूली बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यात मृत आणि जखमी नागरिकांना 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई दिली गेली आहे. तर 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती बेस्ट प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे मागील 5 वर्षात घडलेल्या अपघाताची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानभरपाईची माहिती विचारली होती. बेस्टचे वरिष्ठ वाहतुक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी अनिल गलगली यांस मागील 5 वर्षांची सविस्तर माहिती दिली.

मागील 5 वर्षात 834 बेस्ट बस अपघात झाले असून यात बेस्ट आणि खाजगी कंत्राटदार यांचा समावेश आहे. बेस्टचे 352 अपघात असून यात जीवितहानीची संख्या 51 आहे तर खाजगी कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या 482 अपघातात 37 जीवितहानी झाली आहे. वर्ष 2022-23 आणि वर्ष 2023-24 मध्ये सर्वाधिक प्रत्येकी 21 जीवितहानी झाली आहे. 

मागील 5 वर्षांत मृत आणि जखमी यांस 42.40 कोटींची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आली असून 494 प्रकरणे होती. यात सर्वाधिक रक्कम ही वर्ष 2022-23 यात देण्यात आली. त्यावर्षी 107 प्रकरणात सर्वाधिक आर्थिक नुकसान भरपाई रक्कम 12.40 कोटी इतकी आहे. वर्ष 2019-20 मध्ये 9.55 कोटी, वर्ष 2020-21 मध्ये 3.44 कोटी, वर्ष 2021-22 मध्ये 9.45 कोटी, वर्ष 2023-24 मध्ये 7.54 कोटी ही आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम आहे.

मागील 5 वर्षांत प्राणातंक अपघातात कर्मचारी बडतर्फ संख्या 12 आहे आणि वैयक्तिक इजा प्रकरणात 2 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. वैयक्तिक इजा प्रकरणात 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्य कारवाईत ताकीद, समज, सक्त ताकीद, वसुली, द्वंद्वतन श्रेणीत कपात अशी कारवाई करण्यात आली आहे.

ही आकडेवारी बेस्ट प्रशासनाची सुरक्षिततेची जबाबदारी अधोरेखित करते. यावरून प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते, असे अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad