व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या दोन तोतया पालिका अधिकाऱ्यांना बेड्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2024

व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या दोन तोतया पालिका अधिकाऱ्यांना बेड्या



मुंबई – कारवाईच्या नावाखाली दुकानदारांकडून पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पालिका अधिकाऱ्यांना मुलुंड पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी पालिकेची बनावट ओळखपत्रे जप्त केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुलुंड मधील एल.बी.एस. रोडवरील एका किराणा मालाच्या दुकानात सोमवारी दुपारी दोघेजण आले. त्यांनी आपण पालिका अधिकारी असल्याची बतावणी करीत प्लस्टिक पिशव्यांवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी दुकानात तपासणीही केली. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर त्यांनी दुकानात अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याचे कारण पुढे करीत दुकानदाराला एक हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. कारवाईच्या भीतीने दुकानदाराने तत्काळ एक हजार रुपये काढून दिले. मात्र आरोपींनी दुकानदाराला पावती दिली नाही. त्यामुळे दुकानदाराला संशय आला.

दुकानदाराने तत्काळ ही बाब व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली. ही बाब आसपासच्या दुकानदारांनाही समजली. त्यामुळे आसपासचे काही दुकानदार तत्काळ या दुकानात पोहोचले. त्यांनी या दोन्ही आरोपींना पकडले आणि घटनेची मुलुंड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली. पोलिसांना त्यांच्याजवळ महापालिकेची दोन बनावट ओळखपत्रे सापडली. हनीफ सय्यद आणि विजय गायकवाड अशी या आरोपींची नावे असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad