मुंबई - सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील जोखीम कमी करण्यासाठी आणि मुंबईकर नागरिकांना दूषित, अनारोग्य अन्न सेवनापासून परावृत्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. महानगरपालिका हद्दीतील सुमारे १० हजार परवानाधारक खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्यात आज (दिनांक २३ डिसेंबर २०२४) सामंजस्य करार झाला. या अंतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता आणि सज्जता, अन्न शिजवणे किंवा पाककृती करणे, कचरा व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाची माहिती सोबतच प्रभावी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त सभागृहात झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलवर्धन राव, पश्चिम विभागाच्या संचालक प्रीती चौधरी, सहसंचालक डॉ. के. यू. मेथेकर यांच्यासह उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आदी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, मुंबईची ओळख अविरत कार्य करणाऱ्यांचे महानगर अशी आहे. रस्त्यावरील खाद्य पदार्थ आणि मुंबईकरांचे अतूट नाते आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्यासाठी खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे, ही महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. खाद्य पदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याकामी महानगरपालिका सर्वोतोपरी सहकार्य करेल. मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना स्वच्छ, ताजे अन्न पुरवावे, यासाठी परवानाधारक खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचा फायदा खाद्य विक्रेत्यांनी घ्यावा. या प्रशिक्षणामुळे मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत मिळणार आहे. व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छतेची खबरदारी घेतल्यामुळे नागरिकांना गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध होतील. या सामंजस्य करारानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण सत्रे नियमित अंतराने वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत.
मुंबई महानगरातील रस्त्यांवर, रस्त्यांच्या कडेला खाद्यविक्री करणा-या सुमारे १० हजार परवानाधारक विक्रेत्यांना या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) परवानाधारक खाद्य विक्रेत्यांसाठी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेविषयक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांमध्ये अन्न सुरक्षा नियम, स्वच्छतेच्या पद्धती आणि अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी याबद्दलचे ज्ञान व कौशल्य वाढवणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यासोबतच रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांमध्ये 'अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६' च्या अनुपालन करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील जोखीम कमी करणे तसेच मुंबईकर नागरिकांना दूषित, अनारोग्य, अन्न सेवनापासून परावृत्त करणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश असणार आहे.
संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२७ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विभागातील सुमारे १० हजार परवानाधारक खाद्य विक्रेत्यांची प्रशिक्षणासाठी निवड बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत केली जाणार आहे. तसेच, खाद्य विक्रेत्यांच्या अधिकाधिक सहभागासाठी संसाधने एकत्रित करणे, निवडलेल्या खाद्य विक्रेत्यांना प्रमाणपत्र वितरित करणे आणि प्रशिक्षणासाठी लागणारे इतर संसाधने / सहाय पुरवण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे.
तर, रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांसाठी प्रमाणित प्रशिक्षण मॉड्यूल, साहित्य व मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे व पुरवण्याची जबाबदारी भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाची (FSSAI) आहे. प्रशिक्षण अंतर्गत स्वच्छता, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी व साठवणूक आणि अन्नाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी सुरक्षा उपाय याबाबतचे प्रशिक्षण भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणामार्फत दिले जाणार आहे. अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम, २०११ च्या अनुसूची ४ नुसार खाद्य विक्रेत्यांना मुलभूत स्वच्छता पद्धती शिकविण्यात येतील. त्यासोबतच विक्रेत्यांना वाचन साहित्य वितरित करण्यात येईल. प्रशिक्षण सत्रांसाठी पात्र प्रशिक्षक व विषयतज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांचे परिणामकारकता व मूल्यमापन केले जाणार आहे.
सामंजस्य करारानुसार, विविध उपक्रम राबवण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांची संयुक्त समन्वय समिती (Joint Co - ordination Committee) स्थापन केली जाईल. त्यात महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांचे प्रत्येकी तीन सदस्य असतील. समन्वय समितीमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रशासकीय कामकाज, देखरेख, अंमलबजावणी व पुनरावलोकन करण्याची जबाबदारी असेल. प्रशिक्षण अंमलबजावणीच्या यशासाठी एक मानांकन ठरवण्यात येईल व त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.
महानगरपालिकेच्याे वतीने महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तर भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलवर्धन राव यांनी सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment