कोल्हापूर / मुंबई - महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेली सर्व रुग्णालये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल करण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांनी गुरुवारी मंत्रालयात पदभार स्वीकारला आणि कार्यालय प्रवेशही केला, त्यावेळी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल हे सर्वांत मोठे हॉस्पिटल आहे. परंतु, अजूनही तिथे किडनी, लिव्हर, हृदय प्रत्यारोपण होत नाही. जे. जे. हॉस्पिटल यासह नागपूर येथील दोन्ही हॉस्पिटल, आयजीएम, छत्रपती संभाजीनगरचे घाटी हॉस्पिटल, कोल्हापूरचे सीपीआर, लातूर, अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटलला चांगल्या सोयी- सुविधा निर्माण करून देऊ.
राज्यात १२ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये करायची होती. मी केंद्र सरकारचे आभार मानतो की, काही तांत्रिक त्रुटी असतानासुद्धा केंद्राने १० नवीन एमबीबीएस महाविद्यालयांतर्गत ९०० जागांना मान्यता दिली. या कॉलेजच्या इमारती, हॉस्पिटलच्या इमारती, यंत्रसामुग्री यासाठी फार मोठा निधी लागणार आहे.
केंद्राकडून यासाठी निधी मिळविणे आणि राज्य सरकारच्या निधीमधून नवीन मंजूर या महाविद्यालयांना चांगल्या सोयी-सुविधा पुरविणे या कामांना प्राधान्यक्रम राहील. राज्यात काही आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालये सुरू केली आहेत. येणा-या काळात त्यांचीही परिपूर्णता करण्याचे आव्हान आहे. देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय राज्यात सुरू केले आहे. तसेच युनानी पद्धतीचे पहिले शासकीय महाविद्यालय देखील राज्यात काढले आहे. या सगळ्याची पूर्तता करू आणि सबंध महाराष्ट्राच्या स्मरणात राहील असे चिरंतन काम करण्याचा माझा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment