मुंबई - शिवसेनेचे माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना यंदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने ते काहीसे नाराज झाले आहेत. त्यातच केसरकर मंत्री असताना घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश योजनेच्या निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले. त्यावरून केसरकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता केसरकर यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे समजते. त्यात पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्यात आलेल्या निर्णयावर राज्य सरकारकडून फेरविचार सुरू असल्याची माहिती आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून शालेय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार दादा भुसे यांच्याकडे देण्यात आला आहे. सूत्रे स्वीकारताच मागच्या निर्णयावर फेरविचार सुरू करण्यात आला असून, आता पुस्तकाला वह्याची पाने जोडणाचा निर्णय रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. एक राज्य, एक गणवेश या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयावर सुद्धा फेरविचार करण्यात येत आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जेणेकरून दप्तराचे ओझे कमी होईल, याशिवाय शिक्षकांकडून वर्गात शिकवले जात असताना विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्येच याच्या नोंदी घेतल्या जातील, असा उद्देश त्यावेळी सांगण्यात आला होता. मात्र, ज्याप्रकारे तज्ज्ञांकडून आणि काही अधिका-यांकडून या निर्णयासंदर्भात काही सूचना येत आहेत, हे पाहता या निर्णयावर फेरविचार केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच हा निर्णयही रद्द केला जाऊ शकतो. केसरकर यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचा हा निर्णयदेखील रद्द होण्याची शक्यता आहे.
पुस्तकाला वह्यांची पाने छापण्याआधी ज्याप्रकारे कुठलीही वह्यांची पाने न जोडता पुस्तके छापली जायची, तशाच प्रकारची पुस्तके पुन्हा छापण्यासंदर्भात विचार केला जात आहे. नवे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून यावर शासन निर्णय जारी केला जाईल, अशी माहिती आहे. त्यामुळे दीपक केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयात आता बदल करुन ते रद्द होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शालेय शिक्षणमंत्री थेट वर्गातील बेंचवर -
शिक्षण खात्याचा पदभार मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोहोचले आहेत. वर्गातील बेंचवर बसून मुलांकडून त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतील कवितांचे वाचनही करून घेतले. शिक्षकांच्या शाळेतील दप्तरांचीही तपासणी केली. मालेगाव तालुक्यातील देवरपाडे येथील ग्रामीण भागातील शाळांना दादा भुसे यांनी अचानक भेट दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शालेय शिक्षण, आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार आदी अडचणी समजून घेतल्या. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ज्ञानदान वाढवा, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment