मुंबई - परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा बिमोड करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधानसभेत परभणी व बीड जिल्ह्यातील घटनांवरील चर्चेत बोलताना नाना पटोले यांनी सरकारचे वाभाडे काढले, ते पुढे म्हणाले की, महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात गुंडगिरीला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे. बीडमधील वाल्मिक कराडवर ३०२ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याला पोलीस संरक्षण दिले, त्याला पोलीस संरक्षण देण्याची शिफारस करणारा कोण? त्याला कशासाठी पोलीस संरक्षण दिले? परळीत आंधळे व गीते यांच्यात गोळीबार झाला, त्यात गीते यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा संबंध आहे. या घटनेवेळी पीआय महाजन व पाटील नावाचे पीएसआय त्या भागात कार्यरत होते. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या केज विभागात हेच महाजन व पाटील पोलीस विभागात कार्यरत आहेत. वाल्मिक कराडच्या आदेशाने पोलीस विभागातील बदल्या होत आहेत का? बीडची घटना अत्यंत गंभीर असून त्याला राजकीय आशिर्वाद आहे. मंत्रिमंडळातील एक मंत्री यात सहभागी आहे अशी चर्चा आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर केले पाहिजे.
परभणीची घटना ही भीमा कोरगाव सारखीच आहे. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी शेकडो लोक रस्त्यावर जमा झाले, दुकाने बंद झाली. पोलिसांनी घटना झाली त्यावेळीच योग्य ती कारवाई केली असती तर पुढील घटना घडल्या नसत्या. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करुन निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला, जनावरापेक्षाही वाईट पद्धतीने मारहाण केली. पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? परभणीतील घटना सरकार प्रायोजित होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सोमनाथ सुर्यवंशी हा पोलीस लाठीचार्जचा व्हीडिओ शूट करत होता त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली व पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली, सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली पण सरकारने अद्याप एकाही पोलिसावर कारवाई केली नाही. बीडच्या घटनेत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून दोन दिवसात २०० खोटे गुन्हे दाखल केले आहेत, तोच शासन चालवतो. पोलीस काय करतात? पोलीस शासनाचे ऐकताच का गुंडाचे? मुख्यमंत्री सक्षम आहेत तरिही राज्यात अनागोंदी कारभार चालतो कसा? बीडमध्ये एका गुंडाची दहशत आहे, त्याचा ‘आका’ कोण? हे समजले पाहिजे. महाराष्ट्रात फोफावलेल्या या गुंडाराजचा आता अंत झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार कायम राहिला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.
भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवर सातत्याने अत्याचार होत आहेत, त्यांना न्याय मिळत नाही. पवईतील जयभीमनगर झोपडपट्टी ऐन पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका, बिल्डर हिरानंदानी व पोलीसांच्या मदतीने तोडून टाकली. या प्रकरणी सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या अहवालात पोलीस, बीएमसी प्रशासन व बिल्डर हिरानंदानीला दोषी ठरवले आहे पण आजही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही असेही नाना पटोले यांनी निदर्शनास आणून दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी मविआचे आंदोलन..
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणात अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी नागपूरमध्ये आंदोलन केले. नागपूर येथील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मविआच्या आमदारांनी या आंदोलनाला सुरुवात केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरही आंदोलन करून भाजपा व अमित शाह यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
No comments:
Post a Comment