मुंबई/नागपूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. आंबेडकरांचे नाव घेण्याची सध्या फॅशन झाली आहे, देवाचे नाव घेतले असते, तर सात पिढ्या स्वर्गात गेल्या असत्या, असे वक्तव्य केल्याने त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्यावरून मविआचे नेते आक्रमक झाले आहेत. संविधानामुळेच अमित शाह हे गृहमंत्री झाल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
वंचितचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांनी अमित शाह यांच्या विधानावरून भाजपावर पुण्यात जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजपा आता जन्माला आले आहे. त्यापूर्वी जनसंघ आणि आरएसएस होते. या संघटनेनं बाबासाहेबांना सर्वाधिक विरोध केला. अमित शाह यांचे वक्तव्य म्हणजे त्यांची जुनी विचारसरणी पुन्हा बाहेर पडली आहे. त्यात नाविन्य असे काही नाही.
अमित शाहांच्या वक्तव्यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले, बाबासाहेबांचे नाव घेण्याचा इतका द्वेष का आहे, या सर्व बाबी यांना संविधानामुळे, राज्यघटनेमुळे यांच्यावर किती परिणाम होत असेल, किती द्वेष करत असतील. हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर, अख्ख्या देशाचा अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, भाग्यविधाता आणि ईश्वरदेखील ते आहेत.
संविधानाने बनलेलं सभागृह : नितीन राऊत
हे सभागृह संविधानाने बनलेलं सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये संविधानावर जे काही म्हटले जात असेल किंवा संविधान निर्मात्यावर बोलले जात असेल, तर ते म्हणणं मांडण्याचा आम्हाला संपूर्ण अधिकार आहे. या देशाला संविधान काँग्रेस पक्षाने दिले हे विसरता कामा नये , असेही नितीन राऊत म्हणाले.
आंबेडकर ही फॅशन नसून पॅशन : आव्हाड
महात्मा गांधी, आंबेडकर जगाचे विचारस्त्रोत ठरले. तुम्ही ज्या सभागृहात उभे आहात त्या सभागृहाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाली आहे. ते आता बोलू शकतात ते आंबेडकरांच्या संविधानामुळे बोलू शकतात. आंबेडकर ही ‘फॅशन’ नसून ‘पॅशन ’ असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
विरोधकांनी केला सभा त्याग
विधान परिषदेत विरोधक शहांच्या वक्तव्याच्या निषेधात आक्रमक झाले. मात्र सभापतींनी त्यावर बोलू न दिल्याने विरोधकांनी सभात्याग करत घोषणाबाजी केली. यावेळी आमदार सतेज पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. प्रज्ञा सातव, अँड अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले आदी उपस्थित होते.
कामकाजावर बहिष्कार : अंबादास दानवे
बाबासाहेबांच्या अवमान करणा-या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात सभागृहात बोलू दिले जात नाही. आम्हाला त्यांच्या वक्तव्याचा निषेध करायचा होता पण सभापतींनी त्याला विरोध केला. त्यामुळे परिषदेच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार घातला.
राज्य संविधानावरून पेटलाय : शशिकांत शिंदे
शशिकांत शिंदे म्हणाले की संविधानावरून महाराष्ट्र पेटलाय. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे, अशात शांतता राहावी अशी आमची भूमिका आहे. परंतु केंद्रीय गृहमंत्री मुद्दाम असे वक्तव्य करीत आहे, त्यांचा वक्तव्याचा आम्हाला निषेध करत आहोत.
सरकारला सत्तेचा माज : भाई जगताप
काँग्रेसेच आमदार भाई जगताप म्हणाले,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. तसेच ईव्हीएम देवीच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेला आहे. त्यातूनच अशी वक्तव्ये करण्यात येत आहे.
लोकशाहीला मारक : नाना पटोले
हा माज लोकशाहीला मारक आहे. हा खरा संघ आणि भाजपचा चेहरा आहे.’ काँग्रेसेच ज्येष्ठ नेते नाना पटोले म्हणाले,‘आंबेडकरांबद्दल भाजपच्या मनात असलेला राग या वक्तव्यातून दिसून आला आहे. यापूर्वीदेखील अशा स्वरूपाची वक्तव्ये भाजपने केली आहेत. आम्ही त्याचा निषेध करतो.’
नीलम गो-हे विरोधकांवर संतापल्या
बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करुन तुम्ही राजकारण करत आहात. त्यामुळे मी तुम्हाला मुद्दा मांडण्याची संमती देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही सभागृहात आहोत. अशावेळी चुकीच्या नियमानुसार सभागृहाची तुम्ही दिशाभूल करत आहात त्यामुळे मी बोलण्याची संमती तुम्हाला मुळीच देणार नाही’ असे नीलम गो-हे म्हणाल्या.
आंबेडकर आमचे दैवत : आदित्य ठाकरे
बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत. आम्ही आमच्या दैवताचा अपमान सहन करणार नाही. भाजपाच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांबाबत जो द्वेष आहे, संविधानाबाबत द्वेष आहे तो समोर आला आहे. इतके दिवस त्यांनी ते लपवून ठेवले होते, आता ही बाब समोर आली आहे असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
आठवले राजीनामा देणार का? : उद्धव ठाकरे
भाजपा पक्ष आणि उर्मट नेते महापुरुषांचा अपमान करत आहेत. अमित शाहांकडून बाबासाहेबांचा हिणकस आणि उद्दाम प्रकारे उल्लेख करण्यात आला. नेहरूनंतर ते आता आंबेडकर यांच्यावर बोलू लागले आहेत. रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
भीम आर्मीकडून निषेध -
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये अपमान केला. आंबेडकरी अनुयायी यांच्या तीव्र भावना दुखावल्या आहेत. अमित शाह यांना आंबेडकर नावाची एलर्जी असेल तर त्यांनी तात्काळ भारत देश सोडून जावे. भाजप आणि अमित शहा यांच्या विरोधात रस्त्यावर तीव्र निषेध करू तसेच त्यांच्या राजकीय सभा या देशात होऊ देणार नाही असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment