मुंबई - सर्वसामान्य मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली बेस्ट आज डेथलाईन ठरली आहे. कुर्ला पश्चिम आंबेडकर नगर येथे एका कंत्राटी बसने रस्त्यावरील नागरिकांना आणि वाहनांना धडक दिल्याने 49 जण जखमी झाले. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात भीषण असल्याने मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बस रूट क्र. 332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात होती. 9 डिसेंबरच्या रात्री 10. 30 वाजता बस कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे आली असता बेस्टचा भीषण अपघात झाला. बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात 49 जण जखमी झाले. त्यांना जवळच्या पालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना सायन तसेच इतर खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यातील 3 जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. आतापर्यंत या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात ब्रेक फेल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र बेस्टची ही बस खासगी कंत्राटदाराची होती. अपघातामधील ड्रायव्हर अपघात झाला तेव्हा दारू प्यायला होता अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीतून हा आपघात कशामुळे झाला हे समोर येवू शकेल.
बेस्ट प्रशासन दोषी -
दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या युनियनकडून अशा अपघातांना बेस्ट प्रशासनाला दोषी धरण्यात आले आहे. बेस्टमध्ये खाजगीकरण झाल्यापासून असे अपघात वारंवार होताना दिसत आहेत. खाजगी बस या बेस्टच्या आगारातून बाहेर पडताना कोणत्याही तपासणी न करता रस्तावर सेवेसाठी उतरवल्या जातात. खाजगी बसचे ड्रायव्हर यांना योग्य ट्रेनिग्न नसल्याने त्यांना बस चालवता येत नाही. खाजगी बस चालक आणि वाहक यांना पगार अत्यंत कमी असल्याने ते बस चालवून इतर ठिकाणी दुसरी नोकरी करतात त्यामुळे त्यांची झोप नीट होत नाही. मुंबई कर जनतेस जर बेस्टची योग्य सेवा द्यायची असेल तर बेस्टचे खाजगीकरण बंद होणे आवश्यक आहे, असे मत युनियनने मांडले आहे.
No comments:
Post a Comment