नवी दिल्ली - भारत सरकारने तीन अँटी-कॅन्सर औषधांच्या किंमतीत कपातीचे निर्देश कंपन्यांना दिले आहेत. त्याचा कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फायदा होणार आहे. केंद्रीय रसायन आणि खत राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
त्यानुसार, औषधांच्या कमाल किंमतीत कपातीचे निर्देश देण्यात आले आहेत. या औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी शुन्यावर आणण्यात आली आहे. तर जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
कॅन्सरच्या रुग्णांना आर्थिक फटका बसू नये आणि त्यांचा औषधांवरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मंत्र्यांनी केला. औषध निर्मिती करणा-या कंपन्यांनी या अधिसूचनांचे पालन करून औषधांच्या किंमती कमी करण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय औषधी मूल्य निश्चित प्राधिकरणाने याविषयीच्या बदलाची सूचना दिली. ‘एस्ट्राजेनेका फार्मा इंडिया लिमिटेड’ने त्यांच्या काही औषधांच्या किंमतीत कपात केल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानुसार, ‘एस्ट्राजेनेका’ने याविषयीचे एक पत्र दिले आहे. त्यात ‘बीसीडी’ शून्य झाल्याने नवीन बाजारातील स्टॉकची विक्री कमी किंमतीत करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर या औषधांच्या किंमती अधिक स्वस्त होतील. देशात कॅन्सरच्या रुग्णात वृद्धी होत असल्याचे दिसून आले आहे. एका संशोधनानुसार, २०१९ मध्ये भारतात जवळपास १२ लाख नवीन कॅन्सरचे प्रकरणे नोंदवण्यात आले, तर ९.३ लाख मृत्यू झाले आहेत. आशिया खंडात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण असणारा भारत हा दुसरा देश आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रुग्णांना आता उपचारासाठी अधिक खर्च येणार नाही. औषधाच्या किंमतीत कपात झाल्याने त्यांच्यावरील आणि कुटुंबावरील आर्थिक खर्चाचा बोजा कमी होईल. कॅन्सर औषधांवरील किमतीत कपात झाल्याने रुग्णांच्या वैद्यकिय खर्चात कपात होणार आहे.
No comments:
Post a Comment