मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याने मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होत नव्हते. आज 13 दिवसांनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
आझाद मैदान मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
राष्ट्रगीताने तसेच राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नामनिर्देशित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नामनिर्देशित उपमुख्यमंत्र्यांना राज्यपालांच्या अनुमतीने शपथ घेण्यास पाचारण केले. राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुष्पगुच्छ दिल्यानंतर पंतप्रधानांनी तिघांचेही अभिनंदन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment